आठ आमदार अपात्रताप्रकरणी चोडणकरांची याचिका निकाली
सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा
पणजी : काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या आठ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात जुना आदेश कायम ठेवत उच्च न्यायालयाने गिरीश चोडणकरांची 8 आमदारांसंदर्भातील याचिका न्या. एम. एस. कर्णिक आणि न्या. निवेदिता मेहता यांनी निकालात काढली आहे. यामुळे चोडणकर यांना रितसर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सभापती रमेश तवडकर यांनी दिलेल्या आदेशाला काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेची बुधवारी अपुरी राहिलेली सुनावणी काल गुरुवारी दुपारी पुढे घेण्यात आली.
याप्रकरणी सुनावणीवेळी याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व करणारे वकील अभिजित गोसावी यांनी उच्च न्यायालयाने यापूर्वी गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या अशाच एका प्रकरणावर 13 डिसेंबर 2024 रोजी निर्णय दिला होता. त्यातील आणि सध्या दाखल केलेल्या याचिकेतील मुद्दे समान असल्याने हा मुद्दा निकाली काढावा अशी मागणी केली. मागील सरकारच्या काळात काँग्रेसमधून बंडखोरी करत भाजपमध्ये दाखल झालेल्या 10 आमदारांसदर्भात दिलेला जुना आदेश कायम ठेवत उच्च न्यायालयाने गिरीश चोडणकरांची 8 आमदारांसंदर्भातील याचिका निकालात काढली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे गिरीश चोडणकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी नोव्हेंबरमध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान, सभापतींच्या आदेशाविरोधात घटनेच्या कलम 136अंतर्गत याचिका दाखल झाली आहे. कलम 136 नुसार सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी सुनावणी करू शकत नाही, असे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी स्पष्ट केले होते. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी चोडणकरांना कलम 226 नुसार आधी उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर चोडणकरांनी सदर याचिका मागे घेऊन पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयाने सदर याचिका निकालात काढल्याने चोडणकर यांना रितसर सर्वोच्च न्यायालयात अपील करता येणे शक्य होणार आहे.
न्यायालयाचे मानले आभार
गोवा काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांच्या अपात्रतेची याचिका दाखल केल्यानंतर अवघ्या 25 दिवसांत तातडीने निकाली काढल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे त्यांनी आभार मानले आहेत.