चित्रदुर्गचे पालकमंत्री डी. सुधाकर यांचे निधन
बेंगळूरमधील किम्स रुग्णालयात फुफ्फुसाच्या संसर्गावर सुरु होते
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर
राज्य नियोजन आणि सांख्यिकी मंत्री तसेच चित्रदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री डी. सुधाकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. बेंगळूरमधील किम्स ऊग्णालयात त्यांच्यावर फुफ्फुसाच्या संसर्गावर उपचार सुरू होते. परंतु उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी ऊग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते वय 62 वर्षांचे होते. मंत्री डी. सुधाकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
काही दिवसांपूर्वी गुडघ्याच्या वाटीच्या शस्त्रक्रियेसाठी ते यशवंतपूर येथील मणिपाल ऊग्णालयात दाखल झाले होते. दरम्यान, तिथे त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांना किम्स ऊग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे तज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सतत उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वासोच्छवासाद्वारे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, रविवारी सकाळी ऊग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डी. सुधाकर यांची राजकीय कारकीर्द
चित्रदुर्गमधील चळ्ळकेरे येथील व्यावसायिक डी. सुधाकर यांचे काका एस. जयन्ना हे चळ्ळकेरेमधून आमदार म्हणून निवडून आले होते. जयन्ना यांच्यानंतर डी. सुधाकर यांनी राजकारणात प्रवेश केला आणि 2004 मध्ये काँग्रेस पक्षाकडून चळ्ळकेरेमधून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर, चळ्ळकेरे अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आले. दरम्यान, ते हिरियूर मतदारसंघात स्थलांतरित झाले. 2008 मधील निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळविला होता.
यानंतर त्यांनी भाजपच्या येडियुरप्पा सरकारला पाठिंबा देत त्यांच्या मंत्रिमंडळात समाजकल्याण मंत्री म्हणून काम केले. 2013 च्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर हिरियूरमधून विधानसभेवर पुन्हा निवडून आले. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत सुधाकर यांचा भाजपचे उमेदवार पूर्णिमा श्रीनिवास यांच्याकडून पराभव झाला. 2023 च्या निवडणुकीत हिरियूरमधून पुन्हा विजयी झालेल्या डी. सुधाकर यांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात नियोजन आणि सांख्यिकी मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
जैन समाजाचे असलेले सुधाकर सर्वच समाजांसाठी प्रिय होते. ते 4 वेळा विजय मिळवून विधानसभेत प्रवेश केला होता. सुधाकर यांनी सहकारी क्षेत्रातही आपली छाप उमटविली होती. चित्रदुर्ग जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. सत्तेत असो वा नसो, गरिबांना नेहमी मदतीचा हात देणारे डी. सुधाकर हे गरिबांचे भाऊ म्हणून ओळखले जात होते.

मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांकडून शोक
मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्यपाल थावरचंद गेहलोत, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते आर. अशोक, चलवादी नारायणस्वामी, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यासह सर्व मंत्री व आमदारांनी डी. सुधाकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्यपाल थावरचंद गेहलोत, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि इतर अनेक मंत्री व मान्यवरांनी सकाळी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत आदरांजली वाहिली.
चित्रदुर्ग जिल्ह्यात आज सरकारी सुटी
मंत्री डी. सुधाकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने चित्रदुर्ग जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये, सरकारी मालकीच्या संस्था आणि सरकारी व अनुदानित शैक्षणिक संस्थांना 11 मे रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. याचबरोबर राज्यभरात 10 ते 12 मे पर्यंत तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. या काळात कोणतेही सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत. ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो, त्या इमारतींवर तो अर्ध्यावर फडकवला जाईल, असे सरकारने एका अधिसूचनेत म्हटले आहे.
राजकीय क्षेत्रासाठी मोठे नुकसान
नियोजन आणि सांख्यिकी मंत्री डी. सुधाकर यांचे निधन हे राजकीय क्षेत्रासाठी एक मोठे नुकसान आहे. सुधाकर मूळचे चळ्ळकेरेचे. ते 2008 पासून हिरियूरचे आमदार होते. ते एक अत्यंत लोकप्रिय व्यक्ती असून दुसऱ्यांदा मंत्री झाले होते.
-सिद्धरामय्या, मुख्यमंत्री