For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भुतरामहट्टीत दुर्मीळ पक्ष्यांचा किलबिलाट

11:02 AM Oct 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
भुतरामहट्टीत दुर्मीळ पक्ष्यांचा किलबिलाट
Advertisement

प्राणीसंग्रहालयात स्वतंत्र पक्षीसंग्रहालयाची उभारणी, पक्षीप्रेमींना भुरळ

Advertisement

बेळगाव : शहरापासून अगदी जवळ असलेल्या भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात नवीन दुर्मीळ जातीचे पक्षी दाखल झाले आहेत. पक्ष्यांसाठी उभारण्यात आलेल्या स्वतंत्र विभागामध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे संग्रहालयात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे. त्यामुळे भेट देणाऱ्या पक्षीप्रेमींची संख्याही हळूहळू वाढू लागली आहे. शिवाय रंगीबेरंगी दुर्मीळ पक्षी पर्यटकांना भुरळ घालू लागले आहेत. भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयाचा म्हैसूर येथील प्राणीसंग्रहालयाच्या धर्तीवर विकास साधण्यात आला आहे. तब्बल 39 हेक्टर क्षेत्रात विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शिवाय वाघ, सिंह, बिबटे, हरिण, तरस, लांडगा, कोल्हा यासह ससा, मोर, घुबड, पोपट आणि जंगली कोंबड्या ठेवण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच आता दुर्मीळ पांढऱ्या रंगाचे मोर, किंगफिशर, कॉमन ग्रे, हॉर्नबिल, पेलिकन पेंटेंड स्टार्क यासारखे पक्षी दाखल झाले आहेत. या पक्ष्यांना ठेवण्यासाठी स्वतंत्र संग्रहालय निर्माण करण्यात आले आहे. याठिकाणी काचेच्या माध्यमातून त्यांचे दर्शन दिले जात आहे.

पक्ष्यांच्या संख्येत भर पडणार

Advertisement

संग्रहालयाच्या प्रवेशद्वारातच स्वतंत्र पक्षीसंग्रहालय उभारण्यात आले आहे. या ठिकाणी काचेच्या दोन कोठड्या निर्माण करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी हे दुर्मीळ पक्षी ठेवण्यात आले आहेत. आणखी दुर्मीळ पक्षी येत्या काळात आणले जाणार आहेत. त्यामुळे प्राणीसंग्रहालयातील पक्ष्यांच्या संख्येत भर पडणार आहे.

मत्स्यालयाचीही उभारणी

प्राणीसंग्रहालयात दुर्मीळ जातीचे पक्षी आणण्यात आले आहेत. त्यामध्ये पांढऱ्या मोरांचाही समावेश आहे. आणखी पक्षी लवकरच दाखल होणार आहेत. विविध वन्यप्राण्यांबरोबर पर्यटकांना पक्ष्यांचे दर्शनही होत आहे. त्याचबरोबर मत्स्यालयही उभारण्यात आले आहे.

-पवन कनिंग (आरएफओ, भुतरामहट्टी)

Advertisement
Tags :

.