जिल्ह्यात 387 पाळणा घरांमध्ये किलबिलाट
पाळणा घरांची अंमलबजावणी : मुलांचा सांभाळ होत असल्याने रोहयो महिला कामगारांना दिलासा
बेळगाव : रोहयो कामगारांच्या मुलांचा सांभाळ होण्यासाठी राबविण्यात आलेली पाळणा घर योजना सक्रीय झाली आहे. जिल्ह्यात 408 पाळणा घरे सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 387 पाळणा घरे सुरू झाली आहेत. रोहयो कामगारांच्या प्रतिसादामुळे पाळणा घरांची सुरळीतपणे अंमलबजावणी होऊ लागली आहे. तसेच रोहयो कामगारांच्या मुलांच्या संगोपनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे. रोहयो कामगारांच्या तीन वर्षाखालील मुलांचे संगोपन व्हावे, यासाठी पाळणा घरांची संकल्पना अंमलात आणली आहे. या उपक्रमाला गतवर्षीपासून प्रारंभ झाला. मात्र पावसाळ्यादरम्यान रोहयो कामाअभावी याला प्रतिसाद मंदावला. मात्र आता पुन्हा जिल्ह्यात रोहयो कामे जोमाने सुरू झाली आहेत. त्याचबरोबर पाळणा घरांनाही प्रतिसाद वाढू लागला आहे. त्यामुळे पाळणा घरांमध्ये बालकांचा किलबिलाट दिसत आहे.
3 वर्षाखालील मुले असलेल्या महिलांना रोजगार हमी कामावर जाता यावे, यासाठी सकाळी 9 ते दुपारी 3.30 यावेळेत ही पाळणा घरे सुरू करण्यात आली आहेत. रोहयोमधीलच 4 महिलांची या पाळणा घरावर नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय मुलांना मनोरंजनासाठी साधनसामुग्री व साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. तीन वर्षाखालील मुलांना या पाळणा घरात सोडून महिलांना रोजगार कामावर जाणे शक्य होऊ लागले आहे. रोहयो कामामध्ये महिलावर्गाचा समावेश अधिक आहे. मात्र लहान मुले असलेल्या महिलांना रोहयो कामापासून वंचित रहावे लागत होते. यासाठी ग्रामीण भागात ग्रा. पं. स्तरावर पाळणा घरांची संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक लहान मुले असलेल्या महिलांना रोहयो कामावर जाणे शक्य झाले आहे.