चिरणी-धनगरवाडी एक महिन्यानंतरही तहानलेलीच
खेड :
तालुक्यातील चिरणी-धनगरवाडी येथील विहीर आटल्यानंतर पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी पहिला अर्ज दाखल करुन 36 दिवस लोटले तरी धनगरवाडी अजूनही तहानलेलीच आहे. येथे जलस्रोत उपलब्ध झाल्याचा अहवाल आल्यामुळे टँकर सुरू करण्यात आला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तीन दिवसांपूर्वीच घेरारसाळगड-बुथराईवाडी येथे तालुक्यातील पाण्याचा पहिला टँकर धावला. या पाठोपाठच खवटी-खालची धनगरवाडी येथील ग्रामस्थांची तहानही टँकरच्या पाण्यावर भागवली जात आहे. चिरणी-धनगरवाडी, वावेतर्फे-ढेबेवाडी येथील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज करुनही ग्रामस्थ प्रतीक्षेत आहेत. विशेषत: चिरणी-धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी 5 मार्च रोजी टँकरच्या पाण्यासाठी पंचायत समितीकडे पहिला अर्ज दाखल केला होता. ग्रामस्थांची तहान शमवणारी विहीर आटल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते. पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू आहे. प्रशासनाकडे खेटे घालूनही ग्रामस्थांच्या पदरी निराशा पडत आहे. मात्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून येथे जलस्रोत उपलब्ध झाल्याचा अहवाल दिल्यामुळे येथील ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. एकीकडे ग्रामस्थ टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे खेटे घालत असताना दुसरीकडे मात्र जलस्रोत उपलब्ध असल्याचा दावा केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मांडवे-वाडीबेलदारे ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी पंचायत समितीच्या पाणी विभागाकडे अर्ज दाखल केला आहे.
- खेड तालुक्यात 46 सार्वजनिक विहिरीतील उपसला गाळ
तालुक्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने 46 सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसण्यात आला. यामुळे त्या-त्या गावातील ग्रामस्थांना सतावणारा पाण्याचा प्रश्न काही अंशी मिटला आहे. विहिरी गाळमुक्त झाल्याने ग्रामस्थांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.