चिराग शेट्टीचे पुनरागमन लवकरच
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात गेल्या काही वर्षांच्या कालावधीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने पुरुष दुहेरीमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत जागतिक बॅडमिंटन क्षेत्राला आपली ओळख करुन दिली होती. दरम्यान पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर सात्विक आणि चिराग शेट्टी यांची प्रसिद्धी कमी झाली. दरम्यान स्पर्धात्मक बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टीचे पुनरागमन लवकरच होणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत चिराग आणि सात्विक या जोडीला उपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभव पत्करावा लागल्याने भारताला पदकाला मुकावे लागले होते. या स्पर्धेनंतर चिरागने काही दिवसांसाठी या क्षेत्रापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. आता पुढील महिन्यात आपण सात्विक साईराज समवेत पुरुष दुहेरीत पुनरागमन करणार असल्याची घोषणा चिरागने वृत्तसंस्थेशी बोलताना केली. मध्यंतरी सात्विक साईराजला दुखापत झाल्यानंतर तो तंदुरुस्तीसाठी झगडत होता. जागतिक पुरुष दुहेरीच्या मानांकनात या जोडीने पहिल्या स्थानापर्यंत झेप घेतली होती.