चिराग पासवान यांच्या सुरक्षेत वाढ
झेड श्रेणीची मिळणार सुरक्षा
वृत्तसंस्था/ पाटणा
केंद्र सरकारने केंद्रीय मंत्री आणि लोजप (रामविलास)चे प्रमुख चिराग पासवान यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. चिराग यांना आता झेड श्रेणीची सुरक्षा मिळणार आहे. चिराग यांच्या सुरक्षेची जबाबदारी आता सीआरपीएफकडे सोपविण्यात आली आहे. यापूर्वी एसएसबीकडे चिराग यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती.
आगामी काही दिवसांमध्ये सीआरपीएफकडून सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली जाणार आहे. गृह मंत्रालयाकडुन यासंबंधी आदेश जारी करण्यात आला आहे. गुप्तचर खात्याच्या इनपूटनंतर हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
झेड श्ा़sdरणीच्या अंतर्गत चिराग पासवान यांच्या सुरक्षेत एकूण 33 सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत. तसेच सशस्त्र स्टॅटिक गार्ड चिराग यांच्या निवासस्थानी तैनात असतील. याचबरोबर 6 राउंड द क्लॉक पीएसओ, तीन शिफ्टमध्ये आर्म्ड स्कॉर्टचे 12 कमांडो, वॉचर्स शिफ्टमध्ये 2 कमांडो आणि 3 प्रशिक्षित चालक सदैव उपस्थित असतील.
चिराग पासवान हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी रविवारी फ्रान्सच्या डिजॅन शहरात आयोजित एका संमेलनात भाग घेतला होता. वाइन उद्योगातील जागतिक नवोन्मेषांवर आयोजित संमेलनात भाग घेण्याची संधी मिळाल्याने त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहे.
कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनाही केंद्र सरकारच्या वतीने झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते देखील चिराग पासवान यांच्याप्रमाणे सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षा व्यवस्थेत असतील.
जीवाला गंभीर धोका असलेल्या लोकांनाच झेड सुरक्षा दिली जाते. सध्या भारतात प्रामुख्याने चार सुरक्षा श्रेणी आहेत. यात झेड प्लस (36 सुरक्षारक्षकांची व्यवस्था), झेड (22 सुरक्षारक्षकांची व्यवस्था), वाय (11 सुरक्षारक्षक तैनात) आणि एक्स (2 सुरक्षारक्षक तैनात) सामील आहे. याचबरोबर पंतप्रधानांना एसपीजी सुरक्षा मिळते, जी देशातील सुरक्षा श्रेणींची सर्वोच्च पातळी आहे.