Ratnagiri News | चिपळूण नगर परिषदेचे अग्निशमन केंद्र धूळखात
04:30 PM May 20, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
२०१८ साली मार्कंडी येथे अग्निशमन केंद्र उभारण्यात आले
चिपळूण: शहरातील मार्कंडी परिसरात बांधलेली अग्निशमन विभागाची इमारत वापराविना धूळखात पडली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव हे केंद्र बुरुमतळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या इमारतीत आणल्याने केंद्राच्या इमारतीसाठी खर्च झालेले करोडो रुपये वाया गेले आहेत. त्यामुळे ही जबाबदारी कोणाची असा सवाल नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
काही वर्षे मागे जाता अग्निशमन विभाग नगर परिषदेच्या सध्याच्या इमारतीत होता. त्यानंतर दुर्घटनेच्यावेळी भर बाजारपेठेतून गर्दी असताना बंब बाहेर काढणे शक्य होत नसल्याचा मुद्दा पुढे आल्याने २०१८ साली मार्कंडी येथे करोडो रुपये खर्च करून नवे अग्निशमन केंद्र उभारण्यात आले.
येथे आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. असे असताना आता मात्र पूर व अन्य सुरक्षिततेची कारणे देत हे केंद्र बुरुमतळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या इमारतीत आणले गेले आहे. येथे वाहनांसह अन्य साहित्य मोठ्याप्रमाणात ठेवण्यात आले आहे.
मुळातच शहरात दर काही वर्षांनी महापूर येतो. २००५ सालीही महापूर आला होता. त्यामुळे मार्कंडी येथील जागा पूरबाधित आहे हे तेव्हाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना माहिती होते. असे असताना करोडो रुपये खर्च करुन २०१८ साली येथे या केंद्राची इमारत का बांधण्यात आली असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.
त्यामुळे हे वाया गेलेले पैसे कोणाकडून वसूल करायचे असा सवालही उपस्थित होत असून याची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी लावावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
वाचन संस्कृतीला बाधा
मुळातच गेल्या कित्येक वर्षांपासून बुरुमतळी येथील नगर परिषदेच्या इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आहे. या वाचनालयाने अथक प्रयत्नाने हजारो वाचक तयार केले आहेत. असे असताना या अग्निशमन केंद्रामुळे येथील शांतता भंग पावली आहे. त्यामुळे त्याचा वाचकांवर परिणाम होत आहे. याचीही नगर परिषद प्रशासनाने विचार करण्याची मागणी होत आहे.
मुळातच गेल्या कित्येक वर्षांपासून बुरुमतळी येथील नगर परिषदेच्या इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आहे. या वाचनालयाने अथक प्रयत्नाने हजारो वाचक तयार केले आहेत. असे असताना या अग्निशमन केंद्रामुळे येथील शांतता भंग पावली आहे. त्यामुळे त्याचा वाचकांवर परिणाम होत आहे. याचीही नगर परिषद प्रशासनाने विचार करण्याची मागणी होत आहे.
Advertisement
Advertisement