चिपळूण-कराड वाहतूक पूर्ववत
चिपळूण :
मुसळधार पावसामुळे कोयना विभागातील वाजेगाव येथील वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले. परिणामी सोमवारपासून ठप्प असलेली कराड-चिपळूण महामार्गावरील वाहतूक बुधवारी दुपारपासून सुरू झाली. येथील एसटी मध्यवर्ती बसस्थानकातून दुपारी 2 वाजताची पहिली मिरज फेरी मार्गस्थ करण्यात आली.
मुसळधार पावसाने कराड मार्गावर वळण मार्गासाठी बांधलेला छोटा पूल सोमवारी वाहून गेल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक ठप्प झाली होती. दुचाकीसह लहान वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. त्यानंतर हा महामार्ग सुरळीत करण्यासाठी वाजेगाव, शिरळ येथील रस्ते भराव तसेच ज्या-ज्या ठिकाणी पावसामुळे धोका, अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती, अशा ठिकाणची धोकादायक वळणे, अडचणी काढून महामार्ग मजबुतीकरणाचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू होते. अखेर प्रशासनाच्या प्रयत्नाला यश येऊन बुधवारी दुपारनंतर या महामार्गावरून वाहतूक सुरू झाली. त्यानंतर येथील आगारातून पहिली मिरज फेरी मार्गस्थ करून नंतर पुढील फेऱ्या सोडण्यात आल्या. दरम्यान, गेल्या दोन दिवसात येथील आगाराच्या 12 फेऱ्या रद्द करण्यात आल्या.