चिन्मय दास यांचा जामीन फेटाळला
वृत्तसंस्था/ढाका
बांगलादेशातील एका न्यायालयाने त्या देशातील इस्कॉनचे माजी प्रमुख आणि ज्येष्ठ हिंदू नेते चिन्मय कृष्ण दास यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर चट्टोग्राम महानगर दंडाधिकारी मोहम्मद सैफुल इस्लाम यांच्या न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. दास यांच्या बाजूने अपूर्व कुमार भट्टाचार्यजी यांच्यासह 11 वकिलांनी युक्तिवाद केला. दास यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून सध्या ते कारावासात आहेत, अशी माहिती देण्यात आली.
आता दास यांच्यासमोर उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यावर विचार केला जाईल, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. दास यांचा जामीन अर्ज फेटाळला जाणे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया इस्कॉन या संस्थेचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी व्यक्त केली. न्यायालयाकडून त्यांना न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा होती. तथापि, तसे झाले नाही. पण आम्ही आमचा संघर्ष थांबविणार नाही, असेही प्रतिपादन दास यांच्या निकटवर्तीयांनी केले.
वकिलाच्या हत्येमुळे लांबणीवर
नोव्हेंबरमध्येच दास यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. तथापि, त्यांच्या वकिलांची हत्या दहशतवाद्यांनी केल्याने सुनावणी लांबणीवर पडली होती. सुनावणी प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली. दास यांची प्रकृती बिघडलेली आहे. त्यांना तत्काळ चांगल्या वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळणे आवश्यक होते. तथापि, आता यापुढच्या कायदेशीर पर्यायांचा विचार करावा लागणार आहे., अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यांचा जामीन फेटाळल्याने बांगलादेशातील हिंदू समाजही नाराज झाला असल्याची माहिती आहे.