रशियाच्या बाजूने चिनी सैनिक रणांगणात
झेलेन्स्की यांचा दावा : युक्रेनने पकडलेल्या चिनी नागरिकांचा व्हिडिओ जारी
वृत्तसंस्था/कीव
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात चिनी सैनिकही उतरल्याचे दिसून आले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी उत्तर कोरियाच्या सैनिकांनंतर आता दोन चिनी सैनिकांचा व्हिडिओ शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. युक्रेनियन सैन्याने युद्धभूमीवरून दोन चिनी सैनिकांना अटक केल्याचा दावा केला आहे. युक्रेनची सुरक्षा सेवा, गुप्तचर संस्था आणि सैन्याच्या दोन तुकड्या याबाबत सखोल तपास करत आहेत. युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांना बीजिंगशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले असून चीनच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.
झेलेन्स्की यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये रणांगणावरील चिनी सैनिकांच्या सहभागाबाबत माहिती दिली. ‘आमच्या सैन्याने रशियन सैन्यात लढणाऱ्या दोन चिनी नागरिकांना पकडले आहे. हे युक्रेनच्या डोनेत्स्क प्रदेशात घडले. युक्रेनियन अधिकाऱ्यांकडे या लोकांची कागदपत्रे, बँक कार्ड आणि वैयक्तिक माहितीदेखील आहे. चिनी नागरिक सध्या आमच्या ताब्यात आहेत’ असे झेलेन्स्की यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
झेलेन्स्की यांनी शेअर केलेल्या चिनी नागरिकांच्या व्हिडिओमध्ये लष्कराचा गणवेश घातलेला एक माणूस आपल्या हातांनी युद्धाचे दृश्य तयार करताना दिसत आहे. यापूर्वी, झेलेन्स्की यांनी दोन उत्तर कोरियाई सैनिकांना पकडल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. तथापि, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांनी युद्धभूमीवर उत्तर कोरियाच्या सैनिकांच्या उपस्थितीचा दावा मान्य केलेला नाही.