चीनची टेहळणी नौका पुन्हा हिंदी महासागारत
मालदीवच्या दिशेने सरकतेय ‘दा यांग हाओ’
वृत्तसंस्था/ बीजिंग, माले
चीनची एक अत्याधुनिक नौका हिंदी महासागरात पुन्हा दाखल झाली आहे. दा यांग हाओ नावाची ही नौका मालदीव आणि मॉरिशसचे बंदर लुइसपर्यंत जाणार आहे. ही नौका सागरी संशोधनाच्या ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हीकलने युक्त आहे. ऑक्टोबर 2025 पासून या भागात येणारी ही 6 वी चिनी टेहळणी नौका आहे. याचमुळे चीन हिंदी महासागरात कशाचा शोध घेतोय असा प्रश्न उपस्थित होतोय.
भारताकडून क्षेपणास्त्र परीक्षण होणार असल्यास चीन त्याविषयी माहिती जमविण्यासाठी स्वत:च्या टेहळणी नौकांना हिंदी महासागरात पाठवत असतो. दा यांग हाओ चीनच्या सर्वात आधुनिक टेहळणी नौकांपैकी एक आहे. ही एक अत्याधुनिक महासागर सर्वेक्षण नौका आहे. एयूव्ही म्हणजेच ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हीकलने युक्त असून ज्यात छोट्या मानवरहित पाणबुड्या असतात. त्या समुद्रात 600 मीटर खोलवर जाऊन संशोधन करू शकतात. त्या समुद्राखाली जमिनीचा हायरिझोल्युशन नकाशा तयार करू शकतात. या नौकेत प्रगत सोनार, सागरी पाण्याचे तापमना आणि खोलवर क्षेत्रातील ध्वनिचा वेग मापण्याचे तंत्रज्ञान आहे. या माहितीचा चीनला संघर्षाच्या स्थितीत फायदा होऊ शकतो. याच्या मदतीने तो स्वत:च्या पाणबुड्यांना त्यानुसार संचालित करू शकतो.
चीन दरवेळी हिंदी महासागरात स्वत:च्या टेहळणी नौकांना पाठवताना यामागे वैज्ञानिक संशोधन असल्याचे कारण सांगतो. दक्षिण-पश्चिम हिंदी महासागरात चीनकडे ‘पॉलिमेटालिक सल्फाइड’च्या शोधासाठी परवाना आहे. मालदीवमध्ये चीन समर्थक सरकार असल्याने त्याच्या नौकांना बंदरांचा अॅक्सेस सहजपणे मिळत आहे.
भारतासाठी चिंतेची बाब
चीनच्या या नौका खोल समुद्रात अनेकप्रकारचा डाटा मिळवितात. यामुळे चिनी पाणबुड्यांसाठी हिंदी महसागराचे मार्ग सुरक्षित करण्यास मदत मिळेत. यामुळे त्यांना भारतीय आणि अमेरिकन रडारपासून वाचणे सोपे ठरते. या क्षेत्रात चीन आक्रमकतेने हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय नौदल अशाप्रकारच्या चिनी नौकांवर पूर्णवेळ नजर ठेवू असते.