चिनी नौदलाकडून भारतीय नौकेचा पाठलाग
दक्षिण चीन समुद्रात भारत अन् चीन आमने-सामने
वृत्तसंस्था/ बीजिंग
दक्षिण चीन समुद्रात चिनी नौदलाने भारतीय तटरक्षक दलाच्या नौकेचा पाठलाग केला आहे. भारतीय तटरक्षक दलाची ही नौका जपानमधुन सद्भावना यात्रेनंतर मायदेशी परतत होती. भारतीय नौका दक्षिण चीन समुद्राच्या वादग्रस्त स्कारबोरो शोलच्या पश्चिम दिशेकडून पुढे जात असताना तेथे असलेल्या चिनी तटरक्षक दलाच्या नौकेने पाठलाग करण्यास सुरुवात केली. यादरम्यान चिनी तटरक्षक दलाच्या दोन अतिरिक्त नौका देखील तेथे होत्या.
चिनी तटरक्षक दलाचे एक मॉन्स्टर शिप फिलिपाईन्सच्या जलक्षेत्रात ठाण मांडून असताना ही घटना घडली आहे. या घटनेला दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या आक्रमक कारवायांशी जोडून पाहिले जात आहे. दक्षिण चीन समुद्रात स्वत:च्या हितसंबंधांच्या रक्षणाकरता तैनात चीनच्या तटरक्षक दलाने स्वत:च्या सामर्थ्यात जबरदस्त भर टाकली आहे. तटरक्षक दलाच्या अनेक नौका या नौदलाच्या युद्धनौकांइतक्याच शक्तिशाली आहेत.
चिनी तटरक्षक दलाकडे 500 टनाहून अधिक वजनाच्या 225 नौका असून त्या खोल समुद्रात संचालन करण्यास सक्षम आहेत. तर चीनकडे जगातील दोन सर्वात मोठ्या तटरक्षक नौका असून यातील प्रत्येकाचे वजन 10 हजार टन आहे. तर तटरक्षक दलाचे मुख्य काम सागर किनारी आणि सागरी आर्थिक क्षेत्राची सुरक्षा करणेच असते.
चीनची मॉन्स्टर शिप
चिनी तटरक्षक दलाचे झाताऊ-क्लास गस्त नौका जगातील सर्वात मोठी सशस्त्र कोस्ट गार्ड शिप असून ती अमेरिकेच्या नौदलाच्या अर्ले बर्क-क्लास विध्वंसक युद्धनौकेपेक्षाही मोठी आहे. चीन या नौकेचा वापर करत स्वत:च्या शत्रूच्या जलक्षेत्रात घुसखोरी करत दबाव आणत असतो. चीनचा दक्षिण चीन समुद्राच्या क्षेत्रातील जवळपास प्रत्येक देशासोबत सीमा वाद आहे. अशास्थितीत तटरक्षक दलाचे सामर्थ्य वाढवून तो शत्रूपेक्षा वरचढ ठरण्याचा प्रयत्न करत आहे.