चीन-भारतीय विद्यार्थ्यांचा डोनाल्ड ट्रम्प सरकारवर खटला
बेकायदेशीरपणे व्हिसा रद्द केल्याचा आरोप : हद्दपारीचा वाढता धोका
► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक हजारो आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे एफ-1 व्हिसा रद्द केल्यानंतर भारतीय आणि चिनी विद्यार्थ्यांनी मिळून ट्रम्प सरकारविरुद्ध कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे. या विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभाग (डीएचएस) आणि इतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांविरुद्ध खटला दाखल केला आहे. अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनने (एसीएलयू) न्यू हॅम्पशायरच्या यूएस जिल्हा न्यायालयात हा खटला दाखल केला आहे. व्हिसा स्थिती अचानक रद्द केल्याने विद्यार्थ्यांना हद्दपारी आणि ताब्यात घेण्याचा धोका निर्माण होतो.
व्हिसा रद्द करण्याचा निर्णय एकतर्फी आणि बेकायदेशीर असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे आपला शिक्षणाचा, भविष्यातील नोकऱ्यांचा आणि अमेरिकेत कायदेशीर वास्तव्याचा अधिकार हिरावून घेतला जात असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. हे प्रकरण केवळ या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नाही तर ते अमेरिकेत राहणाऱ्या हजारो आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असल्याचे ‘एसीएलयू’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणात 3 भारतीय आणि 2 चिनी विद्यार्थ्यांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडले आहे.