चिनी हॅकर्सनी दिला अमेरिकेला झटका
ट्रेझरी डिपार्टमेंटमध्ये केले हॅकिंग : महत्त्वपूर्ण दस्तऐवजांवर मारला डल्ला
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट म्हणजेच अर्थ मंत्रालयात चिनी हॅकर्सकडून सायबर हल्ला झाला आहे. अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने संसदेला याची माहिती देत चिनी हॅकर्सनी कॉम्प्युटर सिस्टीममध्ये शिरकाव केला होता, असे सांगितले.
हॅकर्सनी काही वर्कस्टेशन आणि दस्तऐवजांपर्यंत अॅक्सेस प्राप्त केला होता असे सॉफ्टवेअर सर्व्हिस प्रोव्हाइडरने विभागाला कळविले आहे. अमेरिकेच्या यंत्रणेने याला गंभीर आणि मोठी घटना मानले असून याच्या तपासासाठी एफबीआय आणि अन्य संस्था मिळून काम करत आहेत. या घटनेला चीनकडून पुरस्कृत अॅडव्हान्स्ड पर्सिस्टेंट थ्रेट (एपीटी) हॅकरशी जोडले गेले आहे. तर ज्या सर्व्हिसवर सायबर अटॅक झाला होता, ती ऑफलाइन करण्यात आली असल्याची माहिती अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाच्या व्यवस्थापकीय सहाय्यक सचिव अदिति हार्डिकर यांनी दिली आहे.
हॅकर्सनी वर्कस्टेशन आणि काही दस्तऐवजांपर्यंत अॅक्सेस मिळविला होता. हॅकर्सनी क्लाउड आधारित सर्व्हिसला सुरक्षित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिस्टीमवर नियंत्रण मिळविले होते.
एटीपी म्हणजेच अॅडव्हान्स्ड पर्सिस्टेंट थ्रेट एक प्रकारचा सायबर हल्ला असतो, ज्यात हॅकर दीर्घकाळापर्यंत कुठल्याही सिस्टीममध्ये शिरकाव करून राहतो. हॅकर्सकडून गुप्तपणे माहिती चोरली जाते आणि सिस्टीमला नुकसान पोहोचविण्यात येते. संबंधित हॅकर्स हे अनेकदा अनेक देशांच्या सरकारांकडून समर्थनप्राप्त असतात आणि ते तंत्रज्ञानात अत्यंत कुशल असतात. तर दुसरीकडे चीनने हॅकिंगचा आरोप फेटाळला आहे.