For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीनी शास्त्रज्ञ महिलेला अमेरिकेत अटक

07:00 AM Jun 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
चीनी शास्त्रज्ञ महिलेला अमेरिकेत अटक
Advertisement

पीकनाशक बुरशीची तस्करी केल्याचा आहे आरोप 

Advertisement

वृत्तसंस्था /वॉशिंग्टन डीसी 

एक चीनी महिला शास्त्रज्ञ आणि तिचा चीनी मित्र यांना अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. पीकांचा नाश करणारी बुरशीची तस्करी अमेरिकेत केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. युनक्विंग जियान (वय 33) आणि झुनयाँग लीयू (वय 34) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर बनावट व्हिसा तयार केल्याचा, तसेच इतरही अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. या दोघांनी अमेरिकेत फ्युसारियम ग्रॅमिनेरम नामक बुरशीची (फंगस) तस्करी केल्याचा आरोप ठेवण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या कायदा विभाग अधिकाऱ्यांनी दिली. ही बुरशी अमेरिकेत आणण्यासाठी त्यांनी निर्यातीची बनावट कागदपत्रे तयार केली. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. तसेच अधिकाऱ्यांसमोर असत्य विधाने केली, असे आरोप आहेत.

Advertisement

बुरशी अत्यंत धोकादायक 

फ्युसारियम ग्रॅमिनेरम या नावाने ओळखली जाणारी ही बुरशी अत्यंत धोकादायक म्हणून ओळखली जाते. गहू, सातू, मका, तांदूळ आदी पिकांना ही बुरशी नष्ट करुन शकते. तिची वाढ आणि प्रसार झपाट्याने होत असल्याने तिला रोखणे कित्येकदा अशक्य होते. तिचा अमर्याद विस्तार झाल्यास पिकांची मोठी हानी होऊन अन्नटंचाई निर्माण होऊ शकते, असा शास्त्रज्ञांचा इशारा आहे.

शेकडो कोटी डॉलर्सची हानी

या बुरशीमुळे प्रत्येक वर्षी शेकडो कोटी डॉलर्स किमतीच्या पिकांचा नाश होतो. ही बुरशी पिकांमध्ये ‘मायोटॉक्झिन’ श्रेणीतील विषांची निर्मिती करते. या विषांचा परिणाम माणसे आणि पाळीव प्राण्यांवर होतो. म्हणून ती केवळ पिकांसाठी नव्हे, तर माणसे आणि जनावरांसाठीही तितकीच धोकादायक आहे. तीन नैसर्गिकरित्या बनते, तशीच कृत्रिमरित्याही बनविण्यात येऊ शकते, अशी माहिती दिली गेली.

प्रयोगांसाठी आणल्याचे म्हणणे

या बुरशीवर अमेरिकेत प्रयोग केले जाणार आहेत. त्यामुळे ती येथे आणण्यात आली आहे, असे प्रतिपादन केले जात आहे. मात्र, असा धोकादायक जैविक पदार्थ अमेरिकेत आणणे हे अमेरिकेची सुरक्षा आणि अमेरिकेतील कायदा यांच्या विरोधात आहे. अशी जैविक वस्तू कोणत्याही कारणास्तव अमेरिकेच्या प्रयोगशाळांमध्ये आणता येत नाही, असे अमेरिकेच्या प्रॉसिक्युटर्सचे म्हणणे आहे.

मिशिगन विद्यापीठाचा संबंध 

जियान ही चीनी शास्त्रज्ञ अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठामध्ये नोकरीला आहे. तिने डेट्रॉईट विमानतळावरुन ही बुरशी अमेरिकेत आणण्याचा प्रयत्न चालविला होता. मिशिगन विद्यापीठात या बुरशीवर संशोधन करण्यात येणार असल्याचे तिचे म्हणणे आहे. मात्र, विद्यापीठाकडून तिच्या दाव्याला दुजोरा मिळाला नाही. त्यामुळे तिच्यासंबंधीचा संशय बळावला आणि तिला अटक करण्यात आली. ही महिला शास्त्रज्ञ आणि तिचा मित्र हे चीनमध्येही या बुरशीच्या निर्मितीवर संशोधन करतात असे आढळून आले आहे, अशी धक्कादायक माहितीही उघड झाली आहे.

चीनवर प्रकरण शेकणार का ?

या बुरशीवरील संशोधनाला चीनचे सरकार आर्थिक साहाय्य करत आहे. जियानलाही चीनच्या सरकारकडून असे साहाय्य मिळाले आहे. इतकेच नव्हे, तर जियानही चीनच्या सत्ताधारी साम्यवादी पक्षाची सक्रीय सदस्य असल्याचीही कागदपत्रे अमेरिकेच्या हाती लागली आहेत. जियान हिचा मित्र लियू याने प्रारंभी अशा तस्करीचे आरोप नाकारले होते. तथापि, अधिक तपासानंतर त्याने तस्करीची कबुली दिल्याचे समजते. त्यामुळे आता चीनवर हे प्रकरण शेकणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप चीनच्या प्रशासनाची प्रतिक्रिया यावर आलेली नाही. मात्र, अमेरिकेची एफबीआय ही गुप्तचर संस्था पुढील तपास करीत आहे.

Advertisement
Tags :

.