For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंबोडिया युद्धातही चिनी साधने निकामी

06:17 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
कंबोडिया युद्धातही चिनी साधने निकामी
Advertisement

व्हेनेझुएलाची पुनरावृत्ती, आता पाकिस्तानला चिंता

Advertisement

वृत्तसंस्था / बँकॉक (थायलंड)

चिनी युद्धसाहित्याची खरेदी करुन त्यांचा उपयोग सशस्त्र संघर्षांमध्ये किंवा युद्धांमध्ये करणाऱ्या देशांवर पश्चात्ताप करण्याची वेळ येत आहे. हा अनुभव प्रथम पाकिस्तानला भारताने त्या देशाविरोधात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या ‘सिंदूर अभियाना’त आला आहे. भारताच्या स्वदेश निर्मित शस्त्रांसमोर चिनी बनावटीची शस्त्रास्त्रे निकामी ठरली होती. अमेरिकेने नुकत्याच व्हेनेझुएलाविरुद्ध केलेल्या कारवाईत व्हेनेझुएलालाही हाच अनुभव आला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील युद्धातही चिनी युद्धसामग्रीने दगा दिला आहे. त्यामुळे जगभरात चिनी युद्धसामग्रीविषयी संशय निर्माण होत आहे.

Advertisement

थायलंड आणि कंबोडिया या पूर्व आशियातील देशांमध्ये काही काळापूर्वी एका प्राचीन आणि जगातील सर्वात मोठ्या मानल्या गेलेल्या ‘हिंदू मंदिरा’च्या स्वामित्वावरुन सशस्त्र संघर्ष निर्माण झाला होता. दोन्ही देशांच्या सेनांनी या मंदिराचे स्वामीत्व मिळविण्यासाठी एकमेकांच्या विरोधात सेना आणि शस्त्रे यांचा उपयोग केला होता. थायलंडने या युद्धसदृष संघर्षात चीनकडून खरेदी केलेले ‘व्हीटी-4’ जातीचे रणगाडे उपयोगात आणले होते. तथापि, हे रणगाडे चालविताना मोठ्या प्रमाणात तांत्रिक समस्या उद्भवतात, हे रणगाडे युद्धाच्या दृष्टीने निरुपयोगी आहेत, अशा तक्रारी थायलंडच्या रणगाडा विभागाच्या सैनिकांनी केल्या आहेत.

रणगाडे पडतात बंद

ऐन युद्धात चिनी रणगाडे बंद पडतात. ते लवकर दुरुस्त करता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर विसंबून राहता येत नाही, असे थायी सैनिकांचे म्हणणे आहे. चिनी रणगाडे निकामी असून त्यांची इंजिने केव्हा बंद पडतील हे सांगता येत नाही, अशा तक्रारी अनेक थायी रणगाडाचालकांनी आपल्या देशाच्या प्रशासनाकडे केल्या आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. इतकेच नव्हे, तर रणगाड्याचा इंजिनाइतकाच महत्वाचा भाग असणाऱ्या गनमध्येही बऱ्याच समस्या आहेत. त्यामुळे या रणगाड्यांवर भरोसा ठेवता येत नाही. अशा तक्रारी होत आहेत.

पाकिस्तानला धास्ती

पाकिस्तानच्या सेनेकडेही चिनी बनावटीचे व्हीटी-4 जातीचे अनेक रणगाडे आहेत. थायलंडच्या अनुभवामुळे आता पाकिस्तानच्या सेनेतही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानने हे चिनी रणगाडे विशेषत्वाने भारताविरुद्धच्या उपयोगासाठी घेतले आहेत. तथापि, भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1971 नंतर रणगाड्यांचे युद्ध झालेले नाही. ‘सिंदूर अभियाना’तही भूसेनेचा उपयोग न करण्यात आल्याने रणगाड्यांच्या युद्धाचा प्रश्न उद्भवला नव्हता. पण भविष्यकाळात भारत-पाकिस्तान यांच्यात मोठा सैनिकी संघर्ष झाल्यास चिनी रणगाडे कितपत उपयोग पडतील, यासंबंधी पाकिस्तानात आता चिंता व्यक्त होत आहे, असे वृत्त आहे.

Advertisement
Tags :

.