चीनचे हुकूमशहा शी जिनपिंग दोन आठवड्यांपासून बेपत्ता?
वृत्तसंस्था/बीजिंग
जगात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा मानस असलेले चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दोन आठवड्यांपासून बेपत्ता असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तसेच चीनमध्ये सत्तांतर होणार आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. जिनपिंग 6-7 जुलै रोजी ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथे होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या बैठकीपासूनही दूर राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. याचदरम्यान शी जिनपिंग यांचे युग संपले आहे काय?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ‘चीनचे सम्राट शी’ यांचा अंत होणार असल्याचे भाकीत केले होते. गेल्या दोन आठवड्यांपासून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग लोकांसमोर आलेले नाहीत. गेल्या काही दिवसात मुख्य प्रवाहात ते दिसत नसल्यामुळे चिनी कम्युनिस्ट पक्षात (सीसीपी) सत्ताबदल सुरू आहे का, अशी अटकळ बांधली जात आहे. शी जिनपिंग हे कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय लष्करी आयोगाचे (सीएमसी) अध्यक्ष आहेत.