चीनच्या महावाणिज्य दूताकडून जपान पंतप्रधानांच्या शिरच्छेदाची धमकी
वृत्तसंस्था/ टोकियो
चीनच्या एका मुत्सद्द्याच्या ऑनलाइन धमकीबद्दल जपानने स्वत:चा विरोध नोंदविला आहे. जपानचे पंतप्रधान सनाए ताकाइची यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली होती. ताकाइची यांनी त्यापूर्वी तैवानसंबंधी वक्तव्य केले होते. कुठल्याही खंताशिवाय शीर एका सेकंदात कापून टाकीन असे चीनचे जपानमधील महावाणिज्य दूत शुए जियान यांनी म्हटले होते. त्यांनी स्वत:च्या पोस्टमध्ये पंतप्रधानांचा उल्लेख केला नव्हता, परंतु ताकाइची यांच्या संसदेतील वक्तव्याचा दाखला दिला होता. वादानंतर शुए यांनी स्वत:ची पोस्ट हटविली आहे.
तैवानवर चीनने आक्रमण केल्यास जपान आत्मरक्षणाच्या अंतर्गत सैन्य पाठवू शकतो. तैवानमध्ये युद्धाची स्थिती जपानसाठी धोका असेल असे जपानच्या पंतप्रधान ताकाइची यांनी देशाच्या संसदेला संबोधित करताना म्हटले होते. चिनी मुत्सद्द्याकडुन धमकी मिळाल्यावरही पंतप्रधान ताकाइची यांनी स्वत:ची भूमिका बदलण्यास नकार दिला आहे. तर चिनी मुत्सद्द्याच्या धमकीनंतर जपानमध्ये आक्रोश असून दोन्ही क्षेत्रीय शक्तींदरम्यान तणाव वाढत असल्याचे चित्र आहे. तैवान जपानच्या क्षेत्रापासून केवळ 60 मैलाच्या अंतरावर आहे. तैवानला चीन स्वत:चा भूभाग ठरवू पाहत आहे.
चिनी मुत्सद्याच्या टिप्पणीला जपानच्या मुख्य कॅबिनेट सचिव मिनोरु किहारी यांनी अत्यंत अयोग्य ठरविले आहे. जू यांनी यापूर्वीही अनेक भडकाऊ टिप्पणी केल्या आहेत. अशास्थितीत आम्ही चीनला शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची सूचना केली असल्याचे किहारी यांनी सांगितले.