चीनच्या समुद्रातील गुप्तहेर
हेरगिरी हे शत्रुला नामोहरम करण्यासाठी प्राचीन काळापासून वापरात असलेले एक तंत्र आहे. शत्रुच्या गोटात आपले हेर पाठवणे, शत्रू गोटातील एखाद्याला फितवून त्याचा हेरगिरीसाठी वापर करणे याबाबतच्या अनेक सुरस कथा जगभरात प्रचलीत आहेत. आजच्या युगात सायबर तंत्रज्ञान, उपग्रह, ड्रोन्स, एआय या माध्यमांचा वापर होतो. अमेरिका, रशिया, चीन, इस्त्रायलसारखे देश या माध्यमांचा हेरगिरीसाठी वापर करण्यात तरबेज मानले जातात. गेल्या आठवड्यात चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा मंत्रालयाने, आपल्या विरोधात हेरगिरीसाठी समुद्री कासव आणि मासे वापरले जात असल्याचा आरोप करून खळबळ माजवली.
मंत्रालयाने, समाज माध्यमांवर ‘अथांग निळ्या समुद्राखाली अंतर्प्रवाह उसळत आहेत’ या काव्यमय शीर्षकांच्या संदेशात, आंतरराष्ट्रीय गुप्तहेर संस्था, संवेदनशील सागरी माहिती चोरण्यासाठी नव्या हेरगिरी उपकरणांचा वापर करत आहेत, असे म्हटले आहे. संदेशाच्या ‘हेर कासव, हेर मासे’ अशा उपशीर्षकाच्या भागात म्हटले आहे की, चीनच्या विशिष्ट जलक्षेत्रात संवेदक (सेन्सर) बसवलेले तुलनेत मोठे सागरी प्राणी सापडले आहेत. हे गुप्त जलचर एका विशिष्ट क्षेत्रात पोहत पाण्याचे तापमान, क्षारांचे प्रमाण, सागरी प्रवाह ही सागरी पर्यावरणाविषयी संवेदनशील माहिती गोळा करत होते. याच बरोबरीने सौर उर्जेवर चालणारे वेव्ह ग्लायडर्स, उच्च दर्जाची सुस्पष्टता असलेले संवेदक बसवलेले तरंगते दिवे आणि मालवाहू जहाजांवर बसवलेली ‘बंदरातील घडामोडी’ टीपणारी सक्षम उपकरणे यांचाही वापर विदेशी गट करत असल्याचे चीनने नमूद केले आहे.
सतर्कतेचे आवाहन
‘समुद्रातील प्रवाहांची गतिशीलता, पाण्याच्या तापमानाची वैशिष्ट्यो, तापमानाचे वितरण आणि समुद्रतळाची रचना या संवेदशील माहितीचा वापर पाण्याखालील नकाशे तयार करण्यासाठी केला जाईल. माहिती आधारे चीनच्या किनारी सुरक्षा व्यवस्थेतील कमकुवत ठिकाणे ओळखली जातील, त्यामुळे विदेशी शक्तींद्वारे चीनची राष्ट्रीय, लष्करी आणि आर्थिक सुरक्षा धोक्यात येईल, असे चीनचे म्हणणे आहे. सतर्कतेचा भाग म्हणून परदेशातून मागवलेल्या उपकरणांची योग्य सुरक्षा तपासणी करण्याचे आवाहन चीनने केले आहे. तसेच समुद्रात आढळलेली कोणतीही संशयास्पद तरंगचिन्हे किंवा उपकरणे आवर्जून कळवण्याचे संदेश मच्छिमारांना दिले आहेत.
सागरी सुरक्षेविषयी सतर्क असलेला चीन, नियमितपणे दक्षिण चीन समुद्र, पूर्व चीन समुद्र आणि तैवान सामुद्रधुनी यासारख्या जवळच्या सागरी क्षेत्रांमध्ये हेरगिरीचे प्रयत्न होत असल्याचा दावा करतो. ही क्षेत्रे जगातील काही लष्करीदृष्ट्या सर्वात संवेदनशील आणि कमालीची वादग्रस्त क्षेत्रे आहेत. 2024 मध्ये चीनने म्हटले होते की, त्यांनी समुद्राच्या तळाशी लपवलेले असे दीपस्तंभ ओळखले आहेत, जे विदेशी पाणबुड्यांच्या वाहतुकीला मार्गदर्शन करून युद्धाची पूर्वतयारी करू शकतात. चिनी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, सरकार आपल्या सागरी हद्दीतील हेरगिरीची उपकरणे उघडकीस आणणाऱ्या मच्छिमारांना पन्नास हजार ते पाच लाख युआनपर्यंत आर्थिक बक्षीस देते. चीनने आता कासव आणि मासे यांचा वापर हेरगिरीसाठी होत असल्याचा आरोप केला असला तरी, असे जलचर कुठे सापडले, त्यांना कोणी सुसज्ज केले याबद्दल कोणताच तपशील दिलेला नाही. यामुळे या दाव्यांत कितपत तथ्य आहे, याबाबत शंका उपस्थित होत आहेत. तथापि, हेरगिरीसाठी सागरी व इतर प्राण्यांचा वापर दर्शवणारी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे असे दावे फेटाळणे कठीण बनते.
काही उदाहरणे अशीही...
‘हेरासारखे दिसू नका’ हा हेरगिरीतील प्राथमिक धडा हेरगिरीसाठी निवडलेल्या माणसांना शिकवला जातो. प्राण्यांच्याबाबतीत तो प्रश्नच उद्भवत नसल्याने सारेच सोपे होऊन जाते. 1960 च्या दशकापासून अमेरिकन नौदल जलसुरूंग शोधण्यासाठी आणि हरवलेल्या जलतरणपटूंना वाचवण्यासाठी डॉल्फिनना प्रशिक्षण देत आले आहे. रशियादेखील असाच उपयोग करत असल्याचे ज्ञात आहे. 2019 मध्ये नार्वेच्या किनाऱ्यावर एक बेलुगा व्हेल मासा सापडला. ज्यावर एक आवरण घातले होते आणि त्यावर कॅमेरा बसवण्याची सोय असल्याचे दिसत होते. आवरणावर हा मासा सेंट पीटसबर्गचा आहे, असे दर्शवणारे लेबल होते. नार्वेजियन मच्छिमार आणि शास्त्रज्ञांनी संशय व्यक्त केला. मात्र रशियाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. बेलुगा व्हेल तर अबोलच होता. 2023 मध्ये ब्रिटीश गुप्तचर यंत्रणेने आपल्या अहवालात, रशिया, युव्रेनच्या ताब्यात असलेल्या क्रिमिया द्वीपकल्पाजवळ प्रशिक्षित डॉल्फिन्स तैनात करून सुरक्षा वाढवत आहे, असे नमूद केले होते. रशियाने, शत्रु पाणबुड्यांचा सामना करण्यासाठी बॉटल-नोज डॉल्फिन्सना प्रशिक्षित करून बंदरातील तरंगत्या पिंजऱ्यात ठेवल्याची नेंदही घेतली गेली. अमेरिकेच्या प्रगत संरक्षण संशोधन उपक्रम संस्थेने काही वर्षांपूर्वी सायबॉर्ग कीटक विकसित करण्याचा प्रयत्न केला होता. कीटकांच्या मज्जातंतूमध्ये तारा टाकून त्यांना नियंत्रित करता येणार होते. यामुळे शत्रुच्या गोटात कीटकरूपी छोटा गुप्तहेर बेमालूम प्रवेश करण्याची व माहिती मिळवण्याची संधी प्राप्त होणार होती. या उपक्रमाचे पुढे काय झाले याची माहिती स्वाभाविकपणे उपलब्ध नाही. तथापि, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सध्या खऱ्याखुऱ्या कीटकांसारखी दिसणारी लहान श्रवण यंत्रे बनवण्यावर भर दिला जात आहे, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. इराणचा अणू संवर्धन कार्यक्रम आणि अमेरिकेचे आक्षेप हा वादाचा व युद्धाचा मुद्दा बनला आहे. 2007 मध्ये इराणी सुरक्षा रक्षकांनी एका अणूसंवर्धन प्रकल्पाजवळ 14 हेरखारींच्या एका गटाला पकडले. त्या नक्की काय करत होत्या हे अस्पष्ट असले तरी, त्यानंतर अशा प्रकल्पाजवळ ‘सुरक्षा’ या घटनेनंतर वाढवण्यात आली होती. अशाच प्रकारच्या कारवाया जगातील इतर भागात, यापूर्वी शार्क, उंदीर, कबुतरांचा वापर करून कमी अधिक यशस्वितेने पार पडल्या आहेत.
गफलत होण्याच्या शक्यता
हेरगिरी हा धूर्त बुद्धिमत्तेचा तितकाच जोखमीचा विषय असल्याने त्यात गफलती होण्याच्या शक्यता सदैव अस्तित्वात असतात. 19 व्या शतकाच्या आरंभी फ्रेंच सम्राट नेपोलियनने साम्राज्य विस्तारासाठी हेरगिरीचा चाणाक्ष वापर केल्याच्या नोंदी आहेत. एका आख्यायिकेनुसार नेपोलियनच्या इंग्लंड स्वारी दरम्यान ईशान्य इंग्लंडच्या किनाऱ्याजवळ एक प्रेंच जहाज फुटले. या प्रदेशातील लोकांनी यापूर्वी कधीही माकड पाहिले नव्हते, किंबहुना त्यांनी कधी फ्रेंच माणूसही पाहिला नव्हता. अशा स्थितीत फुटलेल्या जहाजावरील एक माकड हाती लागले. किनाऱ्यावरील लोकांनी माकडाच्या आवाजास शत्रुची भाषा व माकडास फ्रेंच गुप्तहेर मानून समुद्र किनाऱ्यावर फाशी दिली.
या साऱ्या पार्श्वभूमीवर चीनने हेर जलचरांविषयी केलेल्या दाव्यांबाबत आंतरराष्ट्रीय तज्ञ व सागरी वैज्ञानिकांनी काही प्रमाणात संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, जगभरातील सागरी संशोधक हवामान बदल, प्राण्यांचे स्थलांतर आणि समुद्राचा अभ्यास करण्यासाठी ‘बायो-लॉगिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून कासव व माशांना मागोवा घेणारे संवेदक नियमितपणे लावतात. त्यामुळे चीनने पकडलेले हेर जलचर प्रत्यक्षात सामान्य वैज्ञानिक संशोधनाचा भाग असू शकतात. चीनचे सुरक्षा खाते आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ मंडळींची ही परस्परविरोधी मते पाहता, नेमके काय घडले याचा शोध पुन्हा एखादा निष्णात गुप्तहेरच घेऊ शकेल.
अनिल आजगांवकर