अमेरिकेच्या करांना चीनचे प्रत्युत्तर
अमेरिकेच्या मालावर 34 टक्के कर, कॅनडाकडूनही 25 टक्के कराची घोषणा
वृत्तसंस्था / बिजींग
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर प्रतिद्वंद्वी करांची घोषणा केल्यानंतर जगात एका व्यापार युद्धाला प्रारंभ झाल्याचे दिसून येत आहे. ट्रम्प यांच्या घोषणेला विविध देशांनी प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला असून, चीनने अमेरिकेकडून आयात केल्या जाणाऱ्या मालावर अमेरिकेइतकाच, म्हणजे 34 टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. तसेच कॅनडानेही 25 टक्के कर लावला आहे.
चीनने अमेरिकेसंबंधीची ही घोषणा शुक्रवारी केली. अमेरिकेच्या मालावर 34 टक्के अतिरिक्त कर लागू केला जाईल, असे चीनच्या व्यापार विभागाने स्पष्ट केले. अमेरिकेनेही प्रथम चीनच्या मालावर 20 टक्के कराची घोषणा केली होती. त्यानंतर 34 टक्के प्रतिद्वंद्वी कर लावण्यात आला आहे. अशा प्रकारे एकंदर हा कर 54 टक्के होतो, असे काही अर्थतज्ञांचे मत आहे. चीननेही अशाच प्रकारचे प्रत्युत्तर अमेरिकेला दिल्याने या दोन महासत्तांमधील आर्थिक संघर्ष आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
11 देशांचा समावेश
चीनने केवळ अमेरिकेलाच प्रत्युत्तर दिले आहे असे नाही. चीनने ‘अविश्वासार्ह देशां’ची सूची बनविली असून या सूचीत 11 देशांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, भारताचा समावेश या देशांमध्ये करण्यात आलेला नाही. सूचीतील 11 देशांना होणाऱ्या आपल्या निर्यातीवर चीनने कठोर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेने जो प्रतिद्वंद्वी कर लागू केला आहे, तो त्वरित मागे घ्यावा, असे आवहनही चीनने केले. या करामुळे समीकरणे बिघडतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
कॅनडाचेही प्रत्युत्तर
कॅनडाने अमेरिकेच्या मालावर 25 टक्के प्रतिकर लागू केला आहे. त्यामुळे या दोन शेजारी देशांमध्ये आर्थिक संघर्षाची नांदी म्हटली गेली आहे. ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतरच दोन्ही देशांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. कॅनडाने अमेरिकेचा 51 वा प्रांत व्हावे, असे विधान ट्रम्प यांनी केले होते. कॅनडामध्ये याच वर्षी संसदेची निवडणूक असल्याने त्या देशातील सत्ताधारी पक्षाने अमेरिकेच्या विरोधात कठोर भूमिका घेत आपल्या मतदारांनाही संदेश दिला आहे.
ब्रिटनच्या नेत्याची टीका
ब्रिटनचे नेते केर स्टार्मर यांनी अमेरिकेने ब्रिटीश मालावर 10 टक्के कर लागू केल्याचा निषेध केला आहे. या करामुळे दोन्ही देशांमध्ये आर्थिक तणाव निर्माण होणार आहे. या करामुळे अमेरिकेला निर्यात होणाऱ्या मालाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी, ब्रिटनमध्ये बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले. हे व्यापार युद्ध जगाला कोठे घेऊन जाईल, यासंबंधी आता वेगवेगळी अनुमाने व्यक्त करण्यात येत आहेत. अमेरिकेतही साशंकता असून तेथील शेअरबाजार मोठ्या प्रमाणात आपटले आहेत.
बॉक्स
चीनचा अमेरिकेशी व्यापार किती...
तीन वर्षांपूर्वी अमेरिका आणि चीन यांच्यात करार झाला होता. त्यानुसार, अमेरिकेचा 200 अब्ज डॉलर्सचा माल चीनने आयात केला पाहिज, अशी अट होती. यासाठी दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. तथापि, चीन ही अट पूर्ण करु शकला नाही. कोरोनाच्या उद्रेकामुळे हे शक्य झाले नाही, असे चीनचे म्हणणे आहे. 2017 मध्ये चीनने अमेरिकेच्या 154 अब्ज डॉलर्सच्या वस्तू खरेदी केल्या होत्या. गेल्यावर्षी हे प्रमाण 164 अब्ज डॉलर्सचे होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापारी वाद गेल्या पाच वर्षांपासूनचाच असला तरी, याच कालावधीत दोन्ही देशांचा व्यापारही वाढला होता, दिसून येते असे तज्ञांचे मत आहे. पण यापुढे नेमके काय होणार, हे काही महिन्यांमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे.