चीनची क्विनवेन उपांत्य फेरीत
पराभवानंतरही साबालेंका शेवटच्या चार खेळाडूंत
वृत्तसंस्था / रियाद
येथे सुरू असलेल्या डब्ल्युटीए टूरवरील फायनल्स स्पर्धेत चीनच्या ऑलिम्पिक चॅम्पियन झेंग क्विनवेनने एकेरीची उपांत्यफेरी गाठताना जस्मिन पाओलिनीचा पराभव केला. तर कझाकस्थानच्या रायबाकिनाने आर्यना साबालेंकाचा पराभव केला. पण साबालेंकाने यापूर्वीच आपल्या गटातून आघाडीचे स्थान घेत उपांत्य फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला होता.
महिला एकेरीच्या सामन्यात चीनच्या ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या झेंगने इटलीच्या चौथ्या मानांकित जस्मिन पाओलिनीचा 6-1, 6-1 अशा सरळ सेटस्मध्ये 67 मिनिटांच्या कालावधीत फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. मात्र दुसऱ्या एका सामन्यात कझाकस्थानच्या रायबाकिनाने टॉपसिडेड साबालेंकाचा 6-4, 3-6, 6-1 असा पराभव केला. साबालेंकाचा गेल्या 24 सामन्यातील हा दुसरा पराभव आहे. या स्पर्धेत पोलंडच्या इगा स्वायटेकने गेल्या मंगळवारी अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव केला होता.
या स्पर्धेत आता पर्पल गटातील राऊंडरॉबीन पद्धतीतील शेवटचा सामना झेंग आणि पाओलिनी यांच्यात होणार आहे. या सामन्यानंतर पर्पल गटातील उपांत्य फेरीसाठी दुसरा खेळाडू निश्चित होईल. चीनच्या झेंगने या स्पर्धेत सर्वप्रथम उपांत्यफेरी गाठली आहे. 2013 नंतर या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारी झेंग ही चीनची पहिली टेनिसपटू आहे.