तैवानभोवती चीनचा युद्धाभ्यास, तणाव
वृत्तसंस्था / बीजिंग (चीन)
तैवानच्या भोवती सागरात चीनने मोठ्या प्रमाणात युद्धाभ्यासास प्रारंभ केल्यात त्या प्रदेशातील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. चीनने या युद्धाभ्यासाला ‘जस्टीस मिशन 2025’ असे नाव दिल्याने चीनच्या मनात काय आहे, याविषयी अनेक शंकाकुशंका उपस्थित होत आहेत. तैवानवर आक्रमण करण्याची चीनची योजना असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यामुळे तैवानेही सज्जता ठेवली आहे. तैवानच्या सामुद्रधुनीत अमेरिकेच्याही युद्धनौका असल्याने कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडणार काय, अशी स्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
चीनच्या सेनेने या युद्धाभ्यासाविषयी माहिती दिली आहे. या युद्धाभ्यासात भूमीवरील लक्ष्यांवर वायुहल्ले चढविणे, समुद्रातील लक्ष्यांवर आक्रमण करणे आणि सेनेच्या तीन्ही विभागांमध्ये योग्य समन्वय राखण्याचा सराव करणे या तीन्ही महत्वपूर्ण बाबींचा समावेश आहे, असे चीनचे म्हणणे आहे. चीनच्या पूर्व सागरी कमांडच्या नेतृत्वात हा युद्धाभ्यास आणि युद्धसराव करुन घेतला जात आहे.
तैवानही सज्ज
चीनची अनेक युद्ध विमाने आणि युद्धनौका सध्या तैवानच्या आसपास दिसून येत आहेत. तैवानला घेरण्याचा आणि एकाचवेळी अनेक बाजूंनी त्याच्यावर हल्ला करण्याचा चीनचा बेत आहे काय असा प्रश्न आहे. चीनची काही विमाने आणि नौका हेतुपुरस्सर तैवानच्या वायुक्षेत्रात आणि सागरी क्षेत्रात घुसविल्या जात आहेत. तथापि, तैवासही सज्ज असून वेगवान हालचाली करुन शत्रूचे हल्ले परतविणारी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे, असे प्रतिपादन तैवानच्या सेनेकडून करण्यात आले आहे. चीनने हेतुपुरस्सर तैवानला भडकविण्याचा प्रयत्न चालविला आहे. या प्रदेशातील शांततामय वातावरण बिघडवून तणाव निर्माण करण्याची कृती चीन करीत आहे. पण त्याला यश येणार नाही, अशी टीकाही तैवानने केली.
अमेरिकेच्या अहवालाचा विषय
चीन 2026 आणि 2027 या कालावधीत तैवानचा घास घेण्यास सज्ज झाला आहे, असे निरीक्षण अमेरिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या संरक्षण विषयक अहवालात नोंदविण्यात आले आहे. चीनची दृष्टी जशी तैवानवर आहे, तशीच ती भारताच्या अरुणाचल प्रदेशवरही आहे, असेही प्रतिपादन या अहवालात करण्यात आले आहे. चीनने अमेरिकेची ही निरीक्षणे नाकारली होती. तथापि, तैवानच्या अवती भोवती चीनने युद्धाभ्यास चालविल्याने पुन्हा शंका उत्पन्न होत आहे.