For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कामगारांशिवाय चालणारी चीनची ‘डार्क फॅक्ट्री’

06:42 AM May 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
कामगारांशिवाय चालणारी चीनची ‘डार्क फॅक्ट्री’
Advertisement

24 तास काम करतात रोबोट

Advertisement

तंत्रज्ञानाप्रकरणी चीन आघाडीवर आहे, चीनमध्ये आता अशा फॅक्ट्री तयार होत आहेत, जेथे माणसांची गरज अत्यंत कमी भासते, त्यांना ‘डार्क फॅक्ट्री’ म्हटले जाते. चीनमधील अनेक कंपन्या आता बहुतांश काम यंत्र स्वत: करत असणाऱ्या सिस्टीमवर काम करत आहेत. याचमुळे या फॅक्ट्रींची आता जगभरात चर्चा होत आहे.

डार्क फॅक्ट्रीत काम जवळपास पूर्णपणे यंत्र आणि रोबोट्सद्वारे केले जाते. येथे माणसांची उपस्थिती  अत्यंत कमी असते. अनेक ठिकाणी तर प्रकाशाची गरजही भासत नाही, कारण यंत्रांना माणसांप्रमाणे पाहण्यासाठी प्रकाशाची गरज नसते. याचमुळे त्यांना ‘डार्क फॅक्ट्री’ म्हटले जाते. या फॅक्ट्रींमध्ये रोबोट उत्पादन तयार करतात, पॅकिंग करतात आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचविण्याचे कामही स्वत:च करतात. याचबरोबर एआयच्या मदतीने मशीन्स सामग्रीची गुणवत्ताही तपासतात. चीनमधील दिग्गज तंत्रज्ञान कंपनी शियोमीच्या चांग पिंग फॅक्ट्रीत कुठल्याही कर्मचाऱ्याशिवाय दर सेकंदाला एक स्मार्टफोन तयार होत आहे. येथे बहुतांश काम पूर्णपणे मशीन्स आणि ऑटोमेटेड सिस्टीमद्वारे केले जाते. अशाप्रकारे जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉनने देखली अनेक फॅक्ट्रींमध्ये ऑटोमेशन वाढविले आहे. याचा प्रभाव रोजगारावरही पडला आहे. केवळ कुनशान भागातच 60 हजारांहून अधिक नोकऱ्या संपुष्टात आल्या आहेत.

Advertisement

वाढतेय ऑटोमेशन

चीनमधील मोठी इलेक्ट्रिक वाहन कंपनी बीवायडी आणि सीएटीएल देखील स्वत:च्या प्रकल्पांमध्ये अधिकाधिक रोबोट्स आणि मशीन्सचा वापर करत आहेत. या कंपन्यांचा उद्देश कमी कालावधीत अधिकाधिक उत्पादन करणे आहे. चीनमध्ये फॅक्ट्री कामगारांची संख्या वेगाने कमी झाली आहे. 2013 मध्ये 11.5 कोटी लोक फॅक्ट्रींमध्ये काम करत होते, तर 2025 मध्ये ही संख्या कमी होत 8.5 कोटीपेक्षाही कमी राहिली आहे. याचे सर्वात मोठे कारण ऑटोमेशन आणि रोबोट्सचा वाढता वापर आहे.

सर्वाधिक रोबोट्स चीनमध्ये

चीन आता जगातील सर्वात मोठी इंडस्ट्रियल रोबोट मार्केट ठरला आहे. 2024 मध्ये चीनमध्ये 20 लाखाहून अधिक फॅक्ट्री रोबोट अस्तित्वात होते. हे जगाच्या एकूण मागणीच्या 54 टक्के हिस्सा होते. तर चीनमध्ये दर 10 हजार कामगारांमागे सुमारे 392 रोबोट काम करत आहेत, तर जागतिक सरासरी केवळ 141 इतकी आहे.

वेगाने बदलतेय फॅक्ट्रीचे जग

आगामी काळात जगातील बहुतांश फॅक्ट्री अशाचप्रकारे हायटेक आणि ऑटोमेटेड होऊ शकतात. यामुळे उत्पादन तीव्र होईल, परंतु लोकांना नवे तंत्रज्ञान शिकण्याची गरजही वाढणार आहे. चीनचे हे मॉडेल आता पूर्ण जगासाठी चर्चेचा विषय ठरणार आहे.

24 तास चालते काम

सामान्य फॅक्ट्रींमध्ये कामगारांना आराम आणि शिफ्टची आवश्यकता असते, परंतु डार्क फॅक्ट्रीमध्ये मशीन्स 24 तास सातत्याने काम करू शकतात. चीनच्या अनेक फॅक्ट्री वर्षातील 365 दिवस न थांबता काम करत आहेत. यामुळे कंपन्यांचे उत्पादन वेगाने वाढते आणि कमी वेळेत अधिक सामग्री तयार होते. तसेच मानवी चूकांची शक्यताही कमी होते.

का वाढतोय ट्रेंड?

चीनमध्ये मजुरीचा खर्च सातत्याने वाढत आहे, अशास्थितीत कंपन्या खर्च कमी करण्यासाठी ऑटोमेशन आणि रोबोट्सचा वापर वाढवत आहेत. याचबरोबर तंत्रज्ञानात वेगाने होणारी प्रगतीही याचे मोठे कारण आहे. एआय, स्मार्ट मशीन्स आणि ऑटोमेटेड सिस्टीम आता पूर्वीपेक्षा अधिक जलद आणि अचूकपणे काम करत आहे. चीनचे सरकारही अत्याधुनिक उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे.

Advertisement
Tags :

.