चीनची आगळीक, भारताची कठोर भूमिका
चीनकडून स्टेपल्ड व्हिसा जारी : भारताने खेळाडूंना विमानतळावरुन परत बोलाविले
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतीय वुशु टीममध्ये सामील अरुणाचल प्रदेशच्या तीन खेळाडूंना चीनने सामान्य व्हिसाऐवजी स्टेपल्ड व्हिसा जारी केला होता. चीनच्या या आगळीकीनंतर भारताने कठोर भूमिका घेत वुशु टीमच्या सर्व खेळाडूंना विमानतळावरून परत बोलाविले आहे. चीनचे हे पाऊल अस्वीकारार्ह असल्याचे भारतीय विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. 11 सदस्यीय भारतीय संघ चीनमध्ये आयोजित होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सामील होण्यासाठी बुधवारी रात्री उशिरा रवाना होणार होता. परंतु अधिकाऱ्यांनी सर्व मंजुरीनंतरही त्यांना चीनला जाण्याची अनुमती देण्यास नकार दिला. चिनी अधिकाऱ्यांनी अरुणाचल प्रदेशचे रहिवासी असलेल्या तीन खेळाडूंना साधारण व्हिसाऐवजी स्टेपल्ड व्हिसा जारी केला होता. तर भारत सरकार चीनच्या स्टेपल्ड व्हिसाला मंजुरी देत नाही. चीनच्या आगळीकीमुळे नाराज भारत सरकारने वुशु टीमचा कुठलाही खेळाडू चीनला जाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश खेळाडू गुरुवारी चीनसाठी रवाना होणार होते. या खेळाडूंची विमानतळावर सर्वप्रकारची सुरक्षा तपासणी देखील झाली होती. अशा स्थितीत अधिकाऱ्यांनी या खेळाडूंना घरी परतण्याची सूचना केली.
चीनचे पाऊल अस्वीकारार्ह
चीनमध्ये आयोजित एका आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धेच्या आयोजनात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही खेळाडूंना चीनकडून स्टेपल्ड व्हिसा जारी करण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. चीनचे हे कृत्य अस्वीकारार्ह आहे. आम्ही या मुद्द्यावर चिनी अधिकाऱ्यांसमोर स्वत:चा विरोध नोंदविला आहे. स्टेपल्ड व्हिसावर आमची भूमिका स्पष्ट आहे. व्हिसा देण्याप्रकरणी जात किंवा स्थानाच्या आधारावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव आम्हाला मान्य नाही. भारत अशा प्रकारच्या कृत्यांवर योग्य प्रत्युत्तर देण्याचा अधिकार राखून असल्याचे भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
स्टेपल्ड व्हिसा अन् साधारण व्हिसा
जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्टेपल व्हिसा जारी करण्यात येतो तेव्हा पासपोर्टसोबत एक अन्य कागदाला स्वतंत्रपणे स्टेपलरच्या मदतीने जोडले जाते. तर साधारण व्हिसात असे केले जात नाही. स्टेपल व्हिसाधारक स्वत:चा प्रवास संपवून परतलयावर त्याला मिळणारा स्टेपल व्हिसा, एंट्री अन् आउटिंग तिकिट फाडले जाते. म्हणजेच संबंधिताच्या पासपोर्टवर या प्रवासाचा कुठलाच तपशील नोंद नसतो. तर सामान्य पासपोर्टवर प्रवास तपशील नोंद असतो.