डायव्हिंगमध्ये चीनच्या खात्यात सर्वाधिक सुवर्ण
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळविले 49 वे सुवर्ण, अव्वल स्थानावरील अमेरिकेला टाकले मागे
वृत्तसंस्था/ सेंट-डेनिस (फ्रान्स)
ऑलिम्पिकमध्ये चीनने इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक डायव्हिंग सुवर्णपदके जिंकली असून सोमवारी अव्वल स्थानावर असलेल्या एकेकाळच्या पॉवरहाऊसला म्हणजेच अमेरिकेला त्यांनी मागे टाकले. लिआन जंजी आणि यांग हाओ यांनी 10 मीटर प्लॅटफॉर्ममध्ये विजय मिळवून ही कामगिरी नोंदविली. हे चीनच्या इतिहासातील 49 वे सुवर्णपदक आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने केलेल्या स्पष्टीकरणानंतर चीनच्या या कामगिरीवर शिक्कामोर्तब झाले आहे. विक्रमांच्या काही नोंदीनुसार, अमेरिकेची यादी देखील 49 सुवर्णपदकांची आहे. परंतु आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनुसार, 1904 मध्ये ‘प्लंगिंग फॉर डिस्टन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या स्पर्धेत अमेरिकेने विजय मिळविला होता तो जलतरण कार्यक्रमांचा भाग मानला जातो, डायव्हिंगचा नव्हे.
लिआन आणि यांग यांनी अचूक ‘सिंक्रोनायझेशन’सह शर्यतीतील इतर सात जोड्यांचे आव्हान उडवून लावले. पॅरिस गेम्समध्ये चीन सर्व आठ स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाचा भक्कम दावेदार म्हणून उतरला आहे. त्यामुळे सर्वांत जास्त सुवर्णपदकांचा अमेरिकी विक्रम त्याने मोडीत काढणे ही एक निश्चित गोष्ट मानली जात होती.
चीनने या ऑलिम्पिकमध्ये सध्या दोन सुवर्णपदके मिळविलेली असून 2000 मधील सिडनी गेम्समध्ये डायव्हिंगच्या स्पर्धांची संख्या दुप्पट केल्यापासून सर्व आठ स्पर्धा जिंकणारा पहिला देश बनण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल चालली आहे. त्या विस्तारानंतर चीनने 50 पैकी 40 सुवर्ण जिंकली आहेत, ज्यात मागील दोन उन्हाळी खेळांमधील प्रत्येकी आठपैकी सात सुवर्णपदकांचा समावेश आहे. 1952 च्या हेलसिंकी गेम्समध्ये अमेरिकेने चारही स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हापासून डायव्हिंगमध्ये क्लीन स्वीप कुणालाच नोंदविता आलेला नाही.