भारताशी सहकार्य करण्यास चीन सज्ज
हत्ती आणि ड्रॅगन यांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आजच्या जागतिक परिस्थितीत हत्ती आणि ड्रॅगन यांनी एकमेकांशी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्ट करत चीनने भारतासह काम करण्यास सज्जता दर्शविली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही देशांमधील संवाद सर्व पातळ्यांवर वाढला आहे. तो सकारात्मक दिशेने पुढे जात आहे, असे प्रतिपादन चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी केले आहे. लडाख सीमेवर दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव आणि संघर्ष तीन वर्षांपूर्वी निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांच्या सेनाधिकाऱ्यांच्या करारानंतर तो निवळला. आता लडाख सीमेच्या सर्व संघर्षबिंदूंवर परिस्थिती झपाट्याने सामान्य होत आहे. तसेच, दोन्ही देशांच्या सेना संघर्षपूर्व स्थितीत परतण्याचा प्रारंभ झाला आहे. तीन संघर्षबिंदूंवर सेनामाघार पूर्ण झाली असून. अन्य तीन बिंदूंवर ही प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्याच्या दृष्टीने ही बाब सकारात्मक मानली जात आहे. वांग यी यांनीही ही बाब अधोरेखित केली.
भागीदारी आवश्यक
भारत आणि चीन यांच्यात भागिदारी होण्याची आवश्यकता आहे. एकमेकांच्या यशात दोन्ही देशांचे योगदान होण्याच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती आहे. भारत आणि चीन यांच्यात सहकार्य होणे ही सर्वोत्तम स्थिती सध्या आहे. भारत आणि चीन यांनी एकमेकांना मागे ओढण्यापेक्षा एकमेकांसह प्रगती करणे योग्य ठरणार आहे. याच मार्गाने भारत आणि चीन यांच्या मूलभूत हितांचे संरक्षण केले जाऊ शकते, असे यी यांनी चीनी संसदेच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला स्पष्ट केले आहे.
प्रमुखांचे मार्गदर्शन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात गेल्या वर्षी रशियामध्ये भेट झाली होती. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्यासंबंधी व्यापक चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांची इच्छा दोन्ही देशांमध्ये बळकट संबंध प्रस्थापित व्हावेत अशी आहे. दोन्ही नेते त्यासाठी आपापल्या देशांना मार्गदर्शन करीत आहेत. दोन्ही देशांमधील सीमातणाव सोडविण्याच्या दृष्टीनेही याच बैठकीत चर्चा झाली होती. त्यानंतरच तणाव निवळण्यास प्रारंभ झाला. आता सहकार्याच्या दिशेने वाटचाल होऊ शकते, असे प्रतिपादन यी यांनी एका पत्रकार परिषदेत केले.
सीमासंघर्षाच्या पलिकडचे संबंध
भारत आणि चीन यांच्यातील संबंध हे केवळ सीमावादाशी जोडले जाऊ नयेत. त्यांच्याकडे केवळ सीमावादाच्या मर्यादित दृष्टीकोनातून पाहून चालणार नाही. ते या मर्यादेच्या कितीतरी पलिकडचे आहेत. व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक आदान प्रदान या बाबीही अत्यंत महत्वाच्या आहेत. दोन्ही देश जगातील अत्यंत प्राचीन संस्कृतींपैकी आहेत. सीमावादाला कसे नियंत्रणात ठेवायचे हे दोन्ही देशांना चांगले कळते. दोन्ही देशांमधील संबंधांची व्याख्या केवळ सीमावादाच्या चौकटीत मांडली जाऊ शकत नाही. यंदाचे वर्ष हे भारत-चीन सहकार्याचे 75 वे वर्ष आहे. या निमित्ताने दोन्ही देशांच्या सहकार्याला एक नवा आयाम मिळू शकतो. ही संधी दोन्ही देशांनी साधावयास हवी, अशी मांडणी त्यांनी या पत्रकार परिषदेत केली.
भारताचाही सहकार्याचा हात
भारतही चीनशी सहकार्य करण्यास उत्सुक आहे. मोठ्या कष्टाने दोन्ही देशांनी वाद मागे टाकून पुढची वाटचाल चालविली आहे. याचे मूल्य भारत जाणतो. दोन्ही देश एकमेकांच्या सहकार्याने सीमेवर शांतता राखण्यात यश मिळवितील. भारतही चीनशी सहकार्याची हातमिळवणी करण्यास उत्सुक आहे. दोन्ही देशांच्या जनतेही संपर्क प्रस्थापित होणे आवश्यक आहे. उत्कट सहकार्यासाठी सांस्कृतिक आदान-प्रदानाची प्रक्रिया गतीमान व्हावयास हवी. भारताही या सहकार्याला सज्ज आहे. भविष्यकाळात याचे परिणाम दिसतील, असे प्रतिपादन जयशंकर यांनीही केले.