For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युद्ध थांबविल्याचा आता चीनचाही दावा

06:22 AM Jan 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
युद्ध थांबविल्याचा आता चीनचाही दावा
Advertisement

‘सिंदूर अभियाना’संबंधी भारताकडून ठाम इन्कार

Advertisement

► वृत्तसंस्था/ बीजिंग (चीन)

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या मे महिन्यात झालेल्या सशस्त्र संघर्षात आपण मध्यस्थी केल्याचा दावा आता चीननेही केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी नेहमीच हा दावा केला आहे. आता चीननेही त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. तथापि, भारताने चीनच्या या प्रतिपादनाला चोख प्रत्युत्तर दिले असून कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारलेली नसल्याची स्पष्टोक्ती केली आहे. पाकिस्तानने विनंती केल्यावरुनच भारताने पाकिस्तानवरील हल्ले थांबविले, या वस्तुस्थितीचा पुनरुच्चार भारताने चीनच्या नव्या विधानानंतर केला आहे.

Advertisement

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘सिंदूर अभियाना’च्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविला होता. 7 मेच्या मध्यरात्रीपासून पुढे चार दिवस चाललेल्या या संघर्षात पाकिस्तानची अतोनात हानी झाली होती. हा संघर्ष माझ्यामुळेच थांबला, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी वारंवार केले आहे. तथापि, गेल्या साडेआठ महिन्यांमध्ये चीनने असे वक्तव्य कधीच केले नव्हते. आता चीननेही असे वक्तव्य करुन ट्रंप यांची री ओढली आहे. भारताने आतापर्यंत अशा प्रत्येक वक्तव्याचा ठाम इन्कार केला असून आताही आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

चीनच्या विदेश मंत्र्यांचे वक्तव्य

चीनचे विदेश व्यवहार मंत्री वांग यी यांनी मावळत्या वर्षाच्या संदर्भात वक्तव्य करताना काही विधाने केली आहेत. मावळत्या वर्षात अनेक देशांमध्ये सशस्त्र संघर्ष आणि सीमातंटे उफाळून आले होते. दुसऱ्या विश्वयुद्धानंतरच्या काळात या वर्षामध्ये त्यांची संख्या सर्वाधिक आहे. या संघर्षांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचाही समावेश आहे. चीनने हे संघर्ष थांबविण्यासाठी मध्यस्थी केली असून या संघर्षांचे युद्धात रुपांतर होऊ देणे टाळलेले आहे, असे विधान त्यांनी केले आहे.

भारताने केली भूमिका स्पष्ट

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांच्या विधानांच्या नंतरही भारताने प्रत्येक वेळी आपली भूमिका स्पष्ट केली होती. ‘सिंदूर अभियाना’च्या संदर्भात भारताने कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारलेली नाही. अलिकडच्या काळात असे बरेच दावे करण्यात आले आहेत. तथापि, त्यांच्यापैकी कोणताही दावा वस्तुस्थितीला धरुन नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष पाकिस्तानच्या विनंतीवरुनच आम्ही थांबविला होता. कोणत्याही अन्य देशाची यात भूमिका नाही, असे स्पष्टीकरण चीनच्या विधानांवर भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने दिले आहे.

काँग्रेसकडून विचारणा

भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा आता चीननेही केला आहे. या संदर्भात भारत सरकारने स्थिती स्पष्ट करावी, असे प्रतिपादन काँग्रेसने केले आहे. केंद्र सरकारने या संदर्भात भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्याशिवाय गोंधळ दूर होणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसने केले आहे. भारताने या वक्तव्यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली असूनही हे वक्तव्य करण्यात आले.

चीनकडून असे वक्तव्य कशासाठी...

भारतावर दबाव आणण्यासाठी चीनने असे वक्तव्य केले असावे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. चीनने गेल्या साडेआठ महिन्यांमध्ये असा दावा केव्हाही केला नव्हता. आत्ताच तो करण्यात आला आहे. याचाच अर्थ चीन दबावतंत्राचा उपयोग करीत आहे, असा होत आहे. मात्र, भारताने या दबावासमोर न झुकता आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केल्याने चीनचे तंत्र त्याच्याच अंगलट आल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. भारताने चीनचे हे वक्तव्य गांभीर्याने घेतलेले असून भारताच्या आजवरच्या धोरणात कोणतेही परिवर्तन झालेले नाही, हे आता सिद्ध होत आहे.

चीनने ओढली अमेरिकेची री

ड अमेरिकेनंतर आता चीनच्याही दाव्याने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आश्चर्य

ड भारतावर दबाव आणण्याचा हा चीनचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया

ड भारताने चीनच्या वक्तव्याचा ठाम इन्कार केल्याने दबावतंत्र असफल

Advertisement
Tags :

.