चीन ही भारताची ‘विषेश समस्या’
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीन ही साऱ्या जगासाठी एक समस्या आहे. मात्र, भारतासाठी ती विशेष समस्या आहे, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. चीनमधील राजकीय व्यवस्था, चीनचे उत्पादने आणि जगात त्या उत्पादनांची विक्री करण्याची चीनची पद्धती हे सारे अन्य देशांपेक्षा भिन्न प्रकारचे आहे. हे भिन्नत्व लक्षात घेतल्याशिवाय त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढणे शक्य नाही, असे प्रतिपादनही जयशंकर यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केले. चीनच्या या वैशिष्ट्यांकडे भारताने प्रारंभापासून, म्हणजेच स्वातंत्र्यापासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्याचे दुष्परिणाम आज दिसत आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली. ते एका वृत्तसंस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
चीनमध्ये होणारा तंत्रज्ञानाचा विकास, त्या देशात होणारी गुंतवणूक, त्या देशाची अर्थव्यवस्था आणि त्याला जोडून असणारी राजकीय व्यवस्था या साऱ्या बाबी योग्यरित्या जाणून घेतल्याशिवाय आपल्याचा चीन समजणार नाही. इतर कोणत्याही देशापेक्षा या देशाची कार्यपद्धती भिन्न आहे. त्यामुळे चीन हा जगासाठी एक सर्वसाधारण समस्या आहे. तथापि, चीनची सीमारेषा भारताशी जोडली गेल्याने भारतासाठी हा देश विशेष समस्येच्या रुपाने उभा आहे. चीनला लागून असणारी आपली राज्ये आणि त्यांची सुरक्षा यांचा वेगळा विचार आपल्या देशाला नेहमी करावा लागतो. गेली चार वर्षे भारत-चीन सीमेवर अनेक स्थानी भारतीय सेना चीनच्या सेनेच्या डोळ्याला डोळा भिडवून उभी आहे. चीनचे त्याच्या अन्य शेजारी देशांशीही असणारे संबंधही अशाच प्रकारचे आहे, अशी मांडणी त्यांनी केली.