For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘शांतता मंडळा’त चीनलाही निमंत्रण

06:47 AM Jan 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘शांतता मंडळा’त चीनलाही निमंत्रण
Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने गाझा पट्टीतील सुरक्षा आणि शांततेसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘शांतता मंडळा’त (बोर्ड ऑफ पीस) सहभागी होण्याचे निमंत्रण चीनलाही देण्यात आले आहे. तथापि, या निमंत्रणाचा स्वीकार चीनने केला आहे की नाही, याविषयी चीनकडून निश्चित विधान करण्यात आलेले नाही. तथापि, संयुक्त राष्ट्रसंघ आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला आम्ही समर्थन देऊ, असे सूचक विधान चीनच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते गुओ जिआकुन यांनी केले. त्यामुळे चीन नेमका कोणता निर्णय घेणार यावर उलट सुलट मते व्यक्त केली जात आहेत. भारतालाही असे निमंत्रण दिले गेले आहे.

आंतरराष्ट्रीय परिस्थितीत कोणतेही परिवर्तन झाले, तरी चीन संयुक्त राष्ट्रसंघाच्या आधारावर बनविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेशी बांधील राहणार आहे. आम्ही कोणत्याही समस्येचे समाधान संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षा करतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणापत्राच्या (चार्टर) आधारावरील व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, असे चीनने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अद्याप चीनने अमेरिकेच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या या गटात समाविष्ट व्हायचे की नाही, यासंबंधी स्थिती संदिग्ध ठेवल्याचे स्पष्ट होत आहे.

Advertisement

अमेरिका-चीन स्पर्धा

सध्या अमेरिका आणि चीन यांच्यात एक प्रकारचे शीतयुद्ध होत आहे, असे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे. दोन्ही देश एकमेकांना विविध मुद्द्यांच्या संदर्भात आजमावत आहेत. चीन संयुक्त राष्ट्रसंघाला अधिक महत्व देताना दिसून येतो. तर अमेरिकेला जगाची व्यवस्था परिवर्तित करायची आहे. अमेरिकेने स्थापन केलेल्या ‘शांतता मंडळा’चे महत्व नेमके काय, अहे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेसंदर्भात चीन अधिक संवेदनशील असल्याचे दिसून येते. अमेरिकेच्या या जागतिक व्यवस्था परिवर्तनाच्या अभियानाला चीन कोणता आणि कसा प्रतिसाद देईल, हे अद्याप स्पष्ट नाही. चीनने त्यासंबंधीचे आपले पत्ते अद्याप खोललेले नाहीत. मात्र, आगामी काळात त्याला त्याची भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. तसेच अमेरिकेचीही भूमिका तो पर्यंत अधिक स्पष्ट होईल. युरोपियन महासंघ आणि इतर आर्थिकदृष्ट्या सबळ देशांनाही झपाट्याने पालटणाऱ्या परिस्थितीत त्यांची भूमिका निर्धारित करावी लागेल. कदाचित, त्यानंतर जगाचे नवे भूराजकीय स्वरुप समोर येईल, अशी चर्चा सध्या केली जात आहे.

Advertisement
Tags :

.