चीनचा अमेरिकेवर प्रहार बंदर शुल्कानंतर हन्वा
वृत्तसंस्था/ बीजिंग
अमेरिका आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचा प्रभाव आता स्पष्टपणे दिसून येऊ लागला आहे. दोन्ही देश आता उघडपणे परस्परांच्या विरोधात आक्रमक पावले उचलत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लादण्यात आलेल्या अतिरिक्त शुल्काच्या प्रत्युत्तरादाखल चीनने प्रथम बंदर शुल्काची घोषणा केली होती आणि आता दक्षिण कोरियन कंपनी हन्वा ओशन कॉर्पोरेशनच्या पाच अमेरिकेशी संबंधित सहाय्यक कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेकडून चीनच्या सागरी, लॉजिस्टिक्स आणि जहाजबांधणी क्षेत्रांच्या चौकशीच्या प्रत्युत्तरादाखल चीनने हे पाऊल उचलले आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाकडून घोषित हे निर्बंध मंगळवारपासून लागू झाले आहेत.
अमेरिकेची कारवाई आंतरराष्ट्रीय कायदा आणि जागतिक संबंधांच्या मूलभूत तत्वांचे घोर उल्लंघन करणारी आहे. तसेच ती चिनी कंपन्यांचे वैध अधिकार आणि हितांना वाईटप्रकारे प्रभावित करते. हन्वा ओशनच्या या अमेरिकन उपकंपन्या अमेरिकन सरकारच्या चौकशीत सहकार्य आणि समर्थन प्रदान करत आहेत, यामुळे चीनचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकाससंबंधी हितांना धोका निर्माण होत असल्याचे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दक्षिण कोरियासोबत जहाजबांधणी सहकार्यावर वारंवार जोर देत असताना चीनने हे निर्बंध लादले आहेत.
अमेरिका-दक्षिण कोरियादरम्यान मजबूत जहाजबांधणी संबंधांमुळे हन्वा ओशनला सर्वाधिक लाभ मिळण्याची शक्यता होती. चीनचे हे पाऊल अमेरिकेच्या विरोधात सूडात्मक कारवाईसोबत जहाजबांधणी क्षेत्रात चीनचा प्रमुख प्रतिस्पर्धी दक्षिण कोरियासाठी एक इशारा देखील आहे. हन्वा शिपिंग एलएलसी, हन्वा फिली शिपयार्ड इंक, हन्वा ओशन यूएसए इंटरनॅशनल एलएलसी, हन्वा शिपिंग होल्डिंग्ज एलएलसी आणि एचएएस यूएसए होल्डिंग्ज कॉर्प या कंपन्यांवर चीनने निर्बंध लादले आहेत.
चीनचे परिवहन मंत्रालय आता अमेरिकेच्या कलम 301 चौकशीच्या प्रभावांची पडताळणी करत आहे. चीनचे शिपिंग, जहाजबांधणी क्षेत्र तसेच संबंधित औद्योगिक आणि पुरवठा साखळीची सुरक्षा आणि विकासहितांना कशाप्रकारे प्रभावित करतेय हे पाहिले जात आहे. चीनच्या बंदरांवर पोहोचणाऱ्या अमेरिकेच्या जहाजांवर विशेष बंदर शुल्क लागू करण्यात येणार असल्याची घोषणा चीनने यापूर्वीच केली आहे.