चीनकडून पाकिस्तानला भारताची गोपनीय माहिती
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांची कबुली : शत्रूराष्ट्रांचे कारनामे उघड
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक मोठा खुलासा केला आहे. भारताबरोबरच्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानला चीनकडून मदत मिळत होती, असे ख्वाजा आसिफ यांनी कबूल केले आहे. बीजिंग भारताबद्दलची माहिती इस्लामाबादला शेअर करते. युद्धादरम्यानही चीनने भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेशी संबंधित माहिती पाकिस्तानला शेअर केली, असे ख्वाजा म्हणाले.
‘भारताबरोबरच्या छोट्या युद्धापासून पाकिस्तान हाय अलर्टवर आहे आणि त्याने आपली दक्षता कमी केलेली नाही. मी पुष्टी करू शकतो की आपण सुरुवातीपासून आतापर्यंत आपली दक्षता कमी केलेली नाही. एका महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. एकमेकांच्या सामरिकदृष्ट्या जवळचे देश एकमेकांशी गुप्तचर माहिती सामायिक करतात, असे ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीत सांगितले.
आपल्याकडे असलेली कोणतीही माहिती आपण सामायिक करतो ही एक सामान्य गोष्ट आहे. जी माहिती आपल्यासाठी धोकादायक आहे ती चीनसाठी देखील धोका आहे. चीनलाही भारतासोबत समस्या आहेत. मला वाटते की आपण उपग्रहावरून गोळा केलेली गुप्त माहिती आणि माहिती एकमेकांशी शेअर करतो ही एक सामान्य गोष्ट आहे, असेही ख्वाजा यांनी याप्रसंगी नमूद केले.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी अ•s उद्ध्वस्त केले. त्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. त्यानंतर, पाकिस्तानकडून भारतीय लष्करी तळ, धार्मिक ठिकाणे व नागरी वस्त्यांवर हल्ले करण्यात आले. नियंत्रण रेषेवरील नागरिकांवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या कुरापतींना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानचे 11 हवाई तळ उद्ध्वस्त केल्यामुळे पाकिस्तानला भारतासमोर गुडघे टेकावे लागले होते.