चीनचाही अमेरिकेवर 125 टक्के कर
व्यापार युद्ध भडकले, चीनचा अमेरिकेवर दावा
वृत्तसंस्था / बिजींग
अमेरिकेने चिनी मालावर 125 टक्के व्यापार शुल्क लागू केल्यानंतर आता चीननेही याला जशास तसे उत्तर दिले आहे. चीननेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या प्रत्येक वस्तूवर 125 टक्के शुल्क आकारले जाईल, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा व्यापार युद्ध भडकणार अशी चिन्हे आहेत.
तसेच, चीनने अमेरिकेवर जागतिक व्यापार परिषदेच्या न्यायालयात दावाही सादर केला आहे. अमेरिकेचे कर धोरण जागतिक व्यापार परिषदेच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. त्यामुळे व्यापार परिषदेने याची गंभीर दखल घ्यावी आणि अमेरिकेला हानीची भरपाई देण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी या दाव्यात करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष आता नव्या पातळीवर पोहचला असून या संदर्भात पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
गुरुवारी तडजोडीची भाषा
गुरुवारी अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांनी तडजोडीची भाषा केली होती. चीनने अमेरिकेच्या करांना प्रत्युत्तर देऊ नये. आमच्याशी चर्चा करावी. चीन चर्चेसाठी आल्यास अमेरिका त्याला सवलत देऊ शकते, अशी अमेरिकेची भाषा होती. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी चीनचे नेते जिनपिंग यांची स्तुतीही केली होती. चीननेही आपण चार पावले पुढे येण्यास तयार आहोत. आम्हाला सन्मानजनक तडजोड हवी आहे, अशी भाषा केली होती. तथापि, शुक्रवारी रंग पालटला आहे.
अंतिमत: काय होणार...
अंतिमत: या व्यापार युद्धातील सर्व संबंधित देशांना एकमेकांशी जुळवून घ्यावे लागणार आहे, असे आंतरराष्ट्रीय व्यापार तज्ञांचे मत आहे. हा संघर्ष कोणाच्याच लाभाचा नाही. यामध्ये कोणाचाही विजय किंवा पराभव होणार नाही. हानी मात्र प्रत्येकाची होणार आहे. संपूर्ण जगाची व्यापार समीकरणे नव्या दिशेने गेल्यास ती पूर्ववत करण्यासाठी प्रचंड कालावधी लागणार आहे. बड्या देशांच्या संघर्षात छोटे देश भरडून निघू शकतात. त्यांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. सर्वांनी संयम पाळणे आवश्यक आहे, असा इशारा अनेक आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञांचा आहे.
बंदुकनळीच्या धाकावर चर्चा नाही
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापक व्यापार चर्चा चाललेली आहे. ती योग्य देशेने जात आहे. अमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन महासंघ यांच्याशी त्वरित एक व्यापार करार करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. तथापि, आम्ही आमच्या देशाचे हित आणि आमच्या देशाचा सन्मान यांच्याशी तडजोड करणार नाही. तसेच धाकधपटशाच्या आधारावर करारास राजी होणार नाही, अशी स्पष्टोक्ती भारताचे व्यापारमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. दोन्ही बाजू एकमेकांसंबंधी संवेदनशील असतील, तरच व्यापार चर्चा पुढे जाऊ शकते. आमच्या सर्व चर्चा उत्तमरितीने प्रगती करत आहेत. ‘भारत प्रथम’ या धोरणाशी आम्ही बांधील आहोत. वेगाने चर्चा करतानाच देशाच्या हिताशी तडजोड केली जाणार नाही. तसा करार लाभदायक ठरणार नाही, असे प्रतिपादन पियुष गोयल यांनी केले आहे.