चिंबलच्या ‘युनिटी’चा एल्गार
महासभेद्वारे शक्तिप्रदर्शनात प्रकटला मुले, महिलांचाही हुंकार,‘युनिटी मॉल’, ‘प्रशासन स्तंभ‘ रद्द न केल्यास प्रखर आंदोलन,मुख्यमंत्र्यांसह राणे, खंवटे, गुदिन्हो या मंत्र्यांवर मोठे दोषारोप
तिसवाडी : चिंबल येथील पर्यटन खात्याच्या प्रस्तावित ‘युनिटी मॉल’ आणि ‘प्रशासन स्तंभ’ या सरकारच्या दोन्ही प्रकल्पांविरोधात काल रविवारी मोठे जनआंदोलन आणि जाहीर महासभा पार पडली. चिंबल येथील ग्रामस्थांसह गोव्याच्या विविध भागांतून आलेले गोमंतकीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विरोधी पक्षातील आमदार, नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही महासभेला हजेरी लावली. हे प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी चिंबलवासीय गेल्या सात दिवसांपासून उपोषण करत आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या महासभेचे नेतृत्व आरजीपीचे अजय खोलकर, एसटी समाजाचे नेते गोविंद शिरोडकर यांनी केले. ग्रामस्थांनी सभेला येण्यापूर्वी मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केले.
गोवा संपविण्याचा सरकारचा घाट
हे दोन्ही प्रकल्प येथे आणण्यामागे एकच उद्देश आहे, की बिल्डर लॉबीला चिंबल आणि सभोवतालची जमीन विकून टाकणे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, नगर व नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी गोवा संपवण्याचा निर्धार केला आहे. आज ही लढाई चिंबल गावाच्या अस्तित्वासाठी असून गोंयकारपण राखण्यासाठी आहे. त्यासाठी आम्ही गेल्या आठवड्याभरापासून उपोषण करत आहोत. जोपर्यंत दोन्ही प्रकल्प रद्द केले जात नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याचा निर्धार चिंबलवासियांनी केला आहे. महासभेला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लोस फेरेरा, आमदार विरेश बोरकर, आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब, आपचे नेते अमित पालेकर, काँग्रेसचे नेते समिल वळवईकर, सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी, रामा काणकोणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांकडून गोवा विकण्याचा कट : आलेमाव
वर्षाच्या सुरुवातीलाच चिंबलवासियांवर उपोषणाला बसण्याची पाळी सरकारने आणली ही गोव्यासाठी दु:खद घटना आहे. या गावात मोठ्या संख्येत एसटी समाज असून त्यांच्या हिताबाबत सरकारला काहीही पडून गेलेले नाही. हा भाग पर्यावरण संवेदनशील असल्याने येथील तळ्यार तळ्याचे अस्तित्व धोक्मयात येईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विक्री करण्याचा कट केला असून मंत्रिमंडळातील सहकारी त्यांना साथ देत आहेत. माझा आणि काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा चिंबलवासियांना आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यावेळी जाहीर केले.
चार मंत्री गोवा संपविण्यात मग्न : परब
आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नगर व नियोजनमंत्री विश्वजित राणे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्यावर निशाणा साधला. हे चौघे मिळून गोवा संपवण्यासाठी कार्यरत असून जमीन विक्री करून परप्रांतीयांना गोव्यात भरण्याचे काम करत आहेत. आज गोवेकरांना रस्त्यावर येऊन आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी लढा देण्याची पाळी याच लोकांनी आणली आहे. गोवेकर एकजूट होऊन यांच्या विरोधात लढले नाहीत, तर येणाऱ्या काळात गोमंतकीयांचे शिल्लक राहिलेले अस्तित्व संपून जाणार आहे, असा इशारा परब यांनी दिला. सध्या युनिटी मॉल प्रकल्प प्राथमिक बांधकाम टप्प्यात असला तरी उत्तर गोवा प्रधान जिल्हा न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीमुळे सर्व कामकाज थांबवण्यात आले आहे. ही स्थगिती 8 जानेवारीपर्यंत लागू राहणार असून प्रकल्पाविरोधातील वाढत्या कायदेशीर हरकती व जनविरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. चिंबल ग्रामपंचायत, स्थानिक रहिवासी तसेच पर्यावरण कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाबाबत गंभीर पर्यावरणीय, कायदेशीर व सामाजिक आक्षेप नोंदवले आहेत.
पर्यावरण संवेदनशील परिसर
आंदोलनकर्त्यांनी विशेषत: प्रकल्पाचे तळ्यार तळे या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पाणथळ भूभागाजवळ असलेले स्थान अधोरेखित केले. या परिसरात होणारे बांधकाम तलावाच्या जलसंचय प्रणालीला धक्का पोहोचवू शकते, जैवविविधतेवर परिणाम करू शकते आणि पणजीसह आसपासच्या भागांसाठी नैसर्गिक पूरनियंत्रणाची भूमिका कमकुवत करू शकते, असा इशारा यावेळी बोलताना विविध कार्यकर्त्यांनी दिला.
रहिवाशांना विस्थापित करणारे प्रकल्प
या प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी जमीन ही कृषी व वनक्षेत्र असून, आदिवासी समुदायांची पिढ्यान्?पिढ्या चालत आलेली उपजीविका यावर अवलंबून आहे. या विकासामुळे पारंपरिक उपजीविका उद्ध्वस्त होण्याची व मूळ रहिवाशांचे विस्थापन होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.