चिंबल ‘युनिटी मॉल’ला स्थगिती पुढील सुनावणी 8 जानेवारीला
पणजी : उत्तर गोवा प्रधान जिल्हा न्यायालयाने चिंबल येथील युनिटी मॉलच्या सुरू असलेल्या बांधकामाला स्थगिती देण्याचा आदेश दिला आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाला 8 जानेवारी 2026 पर्यंत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. चिंबल येथील ग्रामस्थांनी प्रस्तावित युनिटी मॉल प्रकल्पाच्या विरोधात उपोषण सुरू केले होते, ज्यात त्यांनी अधिकाऱ्यांनी पणजी सत्र न्यायालयाच्या बांधकामाला स्थगिती देणाऱ्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. 8 जानेवारी 2026 पर्यंत न्यायालयाची स्थगिती लागू असतानाही पंचायतीने बांधकाम परवाना जारी केल्याचा दावा स्थानिकांनी केल्यानंतर या आंदोलनाला अधिक जोर आला. गोवा पर्यटन विकास महामंडळाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ‘तॉयार तलाव’ पाणथळ जागेवर प्रस्तावित केलेल्या युनिटी मॉलला रहिवासी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध होत आहे.
चिंबल ग्रामपंचायतीने सुऊवातीला या प्रकल्पाला परवानगी नाकारली असून तीन ग्रामसभा ठरावांमध्ये ही योजना फेटाळण्यात आली होती. पर्यटन विकास महामंडळाने पंचायतीच्या या आदेशाला तिसवाडी गट विकास अधिकाऱ्यासमोर आव्हान दिले असता त्यांनी 27 नोव्हेंबर 2025 रोजी 24 तासांच्या आत परवाना जारी करण्याचे निर्देश दिले. पंचायत संचालनालयाकडे केलेल्या त्यानंतरच्या अपीलामध्येही बीडीओचा आदेश कायम ठेवण्यात आला. पंचायत उपसंचालकाने गटविकास अधिकाऱ्याचा आदेश रद्दबातल ठरवल्याने त्यावर उत्तर गोवा जिल्हा न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण अखेरीस सत्र न्यायालयात पोहोचले, जिथे चिंबल जैवविविधता व्यवस्थापन समिती आणि पाणथळ तॉयार तलाव आंदोलनाचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी 6 डिसेंबर 2025 रोजी बांधकामावर स्थगिती मिळवण्यात यश मिळवले. न्यायालयीन आदेशाचा पूर्णपणे आदर होईपर्यंत आपला निषेध सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.