मिरची पिकावर करपा रोगाची लागण
शेतकरी वर्गाला आर्थिक फटका सहन करावा लागल्याच्या प्रतिक्रिया
वार्ताहर/उचगाव
उचगाव परिसरात दरवर्षी उन्हाळी हंगामामध्ये साधारणत: जानेवारी, फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र चालू वर्षाच्या खराब हवामानामुळे बदलणाऱ्या हंगामामुळे मिरची पिकावर करपा रोगाची लागण झाल्याने या भागातील मिरची पिकाने शेतकऱ्यांना यावर्षी दगा दिल्याने मोठा आर्थिक फटका शेतकरी वर्गाला सहन करावा लागल्याच्या प्रतिक्रिया या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. या भागातील माळजमिनीमध्ये तसेच या भागातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीच्या दुतर्फा हजारो एकर जमिनीमध्ये मिरची पिकाची लागवड केली जाते. या परिसरात बटाटे काढणीनंतर मिरची रोप लागवड केली जाते.
तसेच माळ जमिनीत रताळी, भुईमूग, शेंगा आणि पावसाळी मिरची काढणीनंतर मोठ्या प्रमाणात मिरचीची रोप लागवड केली जाते. मात्र चालूवर्षीचा हंगाम पाहता थंडी, गर्मीबरोबरच जोरदार वारा अशा विचित्र हवामानामुळे यावर्षी मिरची पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला आहे. मोठ्या प्रमाणात रोप लागवड करून या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्चही करण्यात आला आहे. मात्र प्रारंभीच्या काळात मिरचीची रोपे जोमाने आली. मात्र मिरची लागवड काळातच या संपूर्ण पिकावर करपा रोगाची लागण झाल्याने हे पीक हातातोंडाशी येतानाच शेतकरी वर्गाला या पिकाने दगा दिला आहे. कीटकनाशक फवारणी करूनही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागू शकले नाही. यामुळे या चालूवर्षी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च दरम्यान मिळणाऱ्या या मिरची पिकाने दगा दिला आहे.
पिकाने फसगत केल्याने पैसा-वेळ वाया
दरवर्षी मिरची पीक भरघोस येते आणि या पिकातून चांगले उत्पादन मिळून आम्हा शेतकऱ्यांच्या हाती चार पैसे लागतात. मात्र चालूवर्षीच्या या हंगामात या मिरची पिकाने फसगत केल्याने आमचा पैसा, वेळ, खत, पाणी वाया गेले असून आर्थिक फटकाही मोठा बसला आहे.
- शेतकरी गुणवंता, उचगाव