For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पालकांच्या महत्वाकांक्षेपोटी मुलांचे हकनाक बळी

02:19 PM Jun 25, 2025 IST | Radhika Patil
पालकांच्या महत्वाकांक्षेपोटी मुलांचे हकनाक बळी
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

अतिमहत्वाकांक्षा, संकुचित वृत्ती, मनाने व बुद्धीने जड झालेल्या प्रतिभाहिन, संवेदना शून्य मुख्याध्यापकाकडून मुलीला मारहाण करून, त्यात तिचा मृत्यू होणे हे अमानवीय कृत्य आहे. मुलांनी खूप अभ्यास करावा, चांगले गुण मिळवावेत, चांगला पगार किंवा पॅकेज मिळवून देणारा अभ्यासक्रम पूर्ण करावा, अशा हव्यासापोटी आणि रेसच्या घोड्याप्रमाणे धावणारे विद्यार्थी पालकांच्या अघोरी मनोवृत्तीला बळी पडत आहेत, आपल्या अपेक्षा मुलांवर लादणे चुकीचे आहे. मुख्याध्यापकाच्या मारहाणीत त्याची स्वत:ची मुलीचा मृत्यू झाला, ही निंदनीय घटना. अशा भावना शिक्षक आमदार, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी ‘तरूण भारत संवाद’शी बोलताना व्यक्त केल्या.

  • मुलांच्या बौध्दिक क्षमतेप्रमाणे शिक्षण द्यावे

समाजातील प्रतिष्ठेपायी पालक आपल्या पाल्यावर अप्रत्यक्षपणे आपल्या विचारांचा आणि प्रतिष्ठेचा दबाव निर्माण करतात. यातूनच कधी कधी उद्रेक होतो. पालकांनी आपल्या मुलांवर आपले विचार लादू नयेत. पालकांनी मुलांबरोबर मित्रत्वाच्या नात्याने वागून त्यांच्या विचारांशी समरस होण्याची गरज आहे. चर्चेतून बौध्दिक क्षमता ओळखून मुलांच्या आवडीच्या क्षेत्रातील मुलांना शिक्षण दिले पाहिजे.

Advertisement

                                                                                                                                   महेश राठोड (विद्यार्थी)

  • परीक्षा एक टप्पा संपूर्ण आयुष्य नाही

गुण कमी मिळाले म्हणजे आयुष्य संपत नाही. स्पर्धात्मक नीट परीक्षेला दरवर्षी 20 लाखापेक्षा अधिक मुलं बसतात. प्रत्येक मुलाचं स्वप्न, त्याच्या भावना महत्त्वाच्या असतात. निराश झालेल्या मुलांना पालकांनी त्यांना आधार द्यायला हवा होता. परीक्षा फक्त एक टप्पा आहे, संपूर्ण आयुष्य नाही. मुलांवर दबाव टाकण्याऐवजी त्यांच मन जपणं गरजेचं आहे.

                                                                                                                                   गौरव कापसे (विद्यार्थी)

  • पालकांनी आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नये

मुलांचे वय त्यांची बौद्धीक क्षमता पाहता पालकांनी मुलांना समजून घेणे महत्वाचे आहे. गुणांच्या हट्टापेक्षा त्याला ज्या अभ्यासात रस आहे, त्यात त्याला त्याचे करिअर करू द्यावे. पालकांनी स्वत:च्या अपेक्षा त्यांच्यावर लादू नयेत

                                                                                                                                    अर्चित कोरे (विधार्थी)

  • पालक मुलांचे मालक नाहीत

केजी टू पीजीच्या मुलांनाही मन आहे हेच मुळात पालक विसरून गेले आहेत. मुलांचे भविष्य वैभवशाली व्हावे ही पालकांची अपेक्षा असतेयात काही गैर नाही. पण त्यासाठी मुलांच्या भावविश्वाचा कोंडमारा करण्याचा मालकी हक्क पालकांना नसतो. मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शाळा, शिक्षक सातत्याने प्रयत्नशील असतात. पण पालकांच्या अवास्तव अपेक्षेतून शिक्षकांनाही वेठीस धरले जात आहे. यातूनच विविध स्पर्धात्मक सराव परीक्षेचा ताण- तणाव मुलांच्यावर वाढतो आहे.

                                                                                                                                ईशा पाटील (विद्यार्थीनी)

  • पालकांनी मुलांच्या कलानुसार शिक्षण द्यावे

प्रत्येक पालकाला आपली मुले उच्च शिक्षण घेऊन मोठी व्हावी असे वाटणे रास्त आहे. पण मुलांचा कलही पाहणे आवश्यक आहे. प्रत्येक मूल हे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात चांगले करिअर करू शकतात. मुलाचा ज्याकडे कल आहे त्याचा मानसशास्त्राrय अभ्यास करून त्या क्षेत्रात त्यालाशिक्षण दिले पाहिजे.

                                                                                                                                    स्वाती काळे (पालक)

  • शिक्षकी पेशाला कलंक

मुले ही देवा घरची फुले म्हणत मुलांना शिकवायचे. एकिकडे स्पर्धेच्या युगात आपला पाल्य एक नंबरला किंवा यशस्वी झालाच पाहिजे. हा अट्टाहास मुलांवर लादणे सर्वस्वी चुकीचे आहे. एका शिक्षकांने स्वत:च्याच मुलीला ज्या पद्धतीने मारले हा शिक्षकी पेशाला लागलेला कलंक आहे.
                                                                                                                                     दिगंबर लोहार (पालक)

  • शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना

शिक्षकांनी आपल्या पाल्याकडून फार मोठया अपेक्षा न ठेवता बुध्दीमतेचा विचार केला पाहिजे. किरकोळ गोष्टीसाठी जबर मारहाण करून, त्यात त्या मुलीचा मृत्यू होणे दुर्दैवी घटना आहे. एक शिक्षक अनेक पिढया घडवतो. अशा शिक्षकाकडूनच असे निंदनीय कृत्य होणे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना आहे. संबंधीत शिक्षकाला कडक शिक्षा मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार.

                                                                                                     आमदार जयंत आसगावकर (शिक्षक आमदार)

  • एका शिक्षकांकडून खेदजनक कृत्य

एखादा पालक आपल्या पाल्यावर अपेक्षांचे ओझे लादत असेल तर त्यांची समजूत शिक्षकांनी काढायची असते. मात्र एका शिक्षकांनेच गुण कमी पडले म्हणून स्वत:च्या मुलीला संपवणे ही बाब खेदजनक आहे. पालक म्हणून सर्वांनीच आपल्या पाल्याचा कल पाहूनच उच्च शिक्षण द्यावे.

                                                                               प्रसाद पाटील (राज्याध्यक्ष,महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना)

  • शिक्षक किंवा पालकांनी मुलांचा आत्मविश्वास वाढवावा

शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना संस्कार देण्याचं, त्यांना घडवण्याचं काम करणाऱ्या शिक्षकांच्या हातून घडलेला प्रकार निंदणीय आहे. मुलीच्या पाठीशी राहून तिचा आत्मविश्वास वाढवणं गरजेचं होत. कोणत्याही प्रसंगात शिक्षकांनी स्वत:चे मुल असो की विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सहकार्य केले पाहिजे. त्यांचा आत्मविश्वास वाढवून स्पर्धात्मक परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

                                                                                          एस. व्ही. पाटील (केंद्रप्रमुख, शिक्षक पिंपळगाव खुर्द कागल)

  • मुलांकडे प्रोडक्ट म्हणून पाहू नये

पाल्याकडून अवास्तव अपेक्षा असल्यानेच शिक्षक पित्याने खोटी प्रतिष्ठा सांभाळण्याच्या नादात पोटच्या पोरीचा बळी घेतला. विद्यार्थी नीट अथवा जेईई परीक्षेतील टॉपरच यशस्वी असतो हेच मुळी चुकीचे आहे. शिक्षणाविषयीच्या आस्थेची जागा आता प्रोडक्ट बेस एज्युकेशन या नव्या संकल्पनेने घेतली आहे. पाल्याकडे प्रोडक्ट या नजरेने पाहीले जाते. मुलांना ब्रॅन्ड बनविण्यासाठी कोचिंग क्लासच्या नावाखाली ज्ञानाच्या फॅक्टरीज निर्माण झाल्या आहेत. क्लासवाले आठवडयाला सराव परीक्षा घेतात, त्यानुसार विघार्थ्यांच्या अभ्यासाचे मोजमाप केले जाते. त्यातून मुलांवर अभ्यासाचा भार टाकल्याने मुले सातत्याने तणतणावात असतात.

                                                                                               दादासाहेब लाड (शिक्षक नेते, तज्ञ संचालक कोजिमाशी)

  • जेईई, नीट परीक्षांचे अवास्तव महत्व कमी करावे

अकरावी-बारावीतील शिक्षण प्रणालीला निरपयोगी ठरवून, जेईई व नीट, सीईटी परीक्षेतील गुणांना अवास्तव महत्व दिले आहे. या परीक्षांना महत्व देवून अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा, वाणिज्य व इतर क्षेत्रातील कॉलेजचे प्रवेश निश्चित केले जातात. या परीक्षांचे महत्व कमी केले तर पालक व मुल शिक्षण व्यवस्थेचे बळी होणार नाहीत.
                                                                                                                                 सुनिल जाधव (पालक)

Advertisement
Tags :

.