For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्याची लगबग

11:21 AM Oct 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्याची लगबग
Advertisement

खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये किल्ले बनवण्यात बालचमू मग्न : शाळांना सुटीचा मुलांनी लुटला असा आनंद

Advertisement

वार्ताहर /किणये

तालुक्यात बालचमूंची गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्याची लगबग सुरू आहे. शुक्रवारी वसुबारस झाले. या दिवसापासून दिवाळी सणाच्या पर्वाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दिवाळी सणात ग्रामीण भागात किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्यात येतात. यंदाही तालुक्याच्या विविध गावांमध्ये बालचमू किल्ले बनविण्यात दंग असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची माहिती शाळेतून मिळते. या माहितीचा आधार घेऊन काही मुले किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवत आहेत. तसेच टीव्हीवरील ऐतिहासिक मालिका, इंटरनेट व फोनद्वारे किल्ल्यांची माहिती व छायाचित्रे पाहून किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्यात येऊ लागल्या आहेत. तालुक्यातील शाळांना सध्या सुटी आहे. या सुटीमध्ये वाढ करण्यात आली. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून किल्ले साकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. माती, दगड, गोळे, प्लास्टर, सिमेंट, रंग आदी साहित्याचा उपयोग करून किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती कशा साकारता येतील यासाठी बालचमू धडपडताना दिसत आहेत. किल्ले बनविताना या बालकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे स्मरण लहानपणापासूनच व्हावे  यासाठी दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ल्यांच्या प्रकृती बनवण्यास शिकवण्याची प्रथा सुरू झाली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्ज्वल्य इतिहास तरुण पिढीला कळावा. त्यांचे आचरण लहानपणापासूनच आणावेत हाही यामागील उद्देश आहे. दरवर्षी दिवाळीच्या आधी शनिवार व रविवार असे दोन दिवस बालचमू किल्ला बनवत असतात. यंदा मात्र दिवाळी सणाच्या आधी शाळांना सुटी असल्यामुळे किल्ला बनवण्यासाठी बालकांना मुभा मिळाली आहे. किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्याची ही परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. अलीकडे किल्ले बनवण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात येऊ लागला आहे. मोबाईलद्वारे अगदी सहजपणे बालकांनाही किल्ल्यांच्या प्रतिकृती किल्ले पाहून त्या पद्धतीने बनविण्यासाठी सोयीस्कर ठरत आहे.

ग्रामीण भागात किल्ले बनवण्यात येत असून शहराच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये अधिक प्रमाणात किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात येऊ लागल्या आहेत. किल्ल्यांसाठी लागणारे माती, दगड व इतर साहित्य अगदी सहजपणे ग्रामीण भागात उपलब्ध होत आहेत. किल्ल्यांमध्ये सिंहासनावर आरुढ असलेले छत्रपती शिवाजी महाराज, किल्ल्यांवर रक्षण करणारे त्यांचे मावळे अशा मूर्ती ठेवण्यात येतात. तोफा व किल्ल्यांचा सुरक्षित भाग, प्रवेशद्वार किल्ल्यात असणारी झाडेझुडपे, विहिरी, भवानीमातेचे मंदिर अशा प्रतिकृती किल्ल्यात दाखविण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहेत. मातीत हात रंगून किल्ला बनविताना बालकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतो आहे. अनेकदा ही बालके किल्ला बनविण्यात इतकी मग्न असतात की खाण्यापिण्याचा त्यांना विसर पडलेला असतो.

सिंधुदुर्ग, शिवनेरी, प्रतापगड, रायगड, सज्जनगड, सिंहगड, तोरणागड तसेच बेळगाव तालुक्यातील राजहंसगड अशा प्रतिकृती साकारण्यात येत आहेत. सध्याच्या आधुनिक युगात मुलांना टीव्ही, मोबाईल याचे अधिक वेड लागल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत लहान बालके जर गडकिल्ले बनवण्यासाठी प्रयत्न करत असतील तर साहजिकच त्यांना इतिहास तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अधिक आवड निर्माण होईल. यासाठी असे गडकिल्ले बनविणाऱ्या बालकांना व तरुणांना सर्व स्तरातून प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. किल्ल्यांसाठी गेल्या पंधरा दिवसापासून ही बालके धडपडताना दिसत आहेत. या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी गावागावातील संघ संस्था व दानशूर व्यक्तींनी मदत करण्याची आवश्यकता आहे.बहुतांशी भागांमध्ये बालकांनी गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत. सोमवारी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर किल्ल्यांचा उद्घाटन सोहळा पडणार आहे.

Advertisement
Tags :

.