टांगलेलं बालपण... तुटलेली माणुसकी
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे घडलेली एक हृदयद्रावक घटना केवळ एक गुन्हा नाही; ती प्रत्येक बापाच्या छातीत धस्स करणारी वेदना आहे. ज्या हातांनी लेकरांना उचलून चालायला शिकवलं, त्याच हातांनी त्या चिमुकल्या जीवांना त्याने दोरीने बांधून टांगलंही. कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे. एखादा सर्वसामान्य बाप, जो दिवसभर कष्ट करून घरी येतो आणि आपल्या मुलीच्या हसण्यात जगण्याचं सार शोधतो, त्याने ही घटना ऐकली, तर त्याच्या मनात किती वादळं उठतील, याची कल्पनाही करवत नाही. बनपुरी गावात दादू यमगर नावाचा एक मजूर आपल्या कुटुंबासह राहतो. चार मुली आणि एक मुलगा असं त्याचं छोटंसं जग. त्यातील अनुजा आणि ऋतुजा या दोन चिमुकल्या मुलींवर घराशेजारून पैसे चोरल्याचा आरोप झाला. बुधवारी ही बाब उघडकीस आली. संध्याकाळी दारूच्या नशेत घरी परतलेल्या वडिलांना ही गोष्ट समजली. रागाने विवेक हरपला. त्यांनी मुलींचे हातपाय बांधले आणि दोघींना घरातील लोखंडी अँगलला टांगून ठेवले. रात्रभर त्या दोन जीवांनी कदाचित ‘बाबा... बाबा...‘ म्हणून हाका मारल्या असतील. त्या हाकांमध्ये भीती होती, वेदना होती, आणि एक निरागस अपेक्षा होती. आपले बाबा आपल्याला वाचवतील. पण त्या रात्री माणुसकी हरवली होती. बापाने कुटुंबातील अन्य सदस्यांनाही धमकावले. सकाळ झाली, आजोबांनी त्यांना सोडवलं; पण त्यात एका मुलीचा जीव गेला होता. ही घटना ऐकताना कोणत्याही आईच्या डोळ्यातून अश्रू वाहतील आणि कोणत्याही बापाचं हृदय थरथरेल. कारण प्रत्येकाला आपल्या मुलीमध्येच ती चिमुरडी दिसेल. पित्याने केलेल्या या क्रूर वर्तनामागे आपल्या मुलांना समाज दोष देतोय याबद्दलची निराशा असू शकते. आपल्याला अधिक मुली आहेत याबद्दलचा राग असू शकतो किंवा अन्यही काही व्यक्तिगत, सामाजिक कारणे असू शकतात. अशी एखादी घटना घडली की संपूर्ण समाज हादरून जातो. त्यानंतर त्यावर चर्चा होत राहते. पण चर्चा संपल्यावर समाज पुन्हा आपल्या दिनचर्येत बुडतो आणि विसरतो. या घटनेत आणखी एक वेदनादायक गोष्ट म्हणजे समाजाचा दबाव. ‘लोक काय म्हणतील?‘ या एका प्रश्नाने कित्येक कुटुंबं आतून तुटत असतात. एखाद्या मुलानं चूक केली, की समाज त्याला सुधारण्याऐवजी कुटुंबाला दोष देतो. त्या दबावाखाली कधी कधी माणूस इतका कोसळतो, की त्याला स्वत:चंही भान राहत नाही. मुलींनी चूक केली असेल. अजाणत्या वयात चूक म्हणजे गुन्हा नाही; ती एक शिकण्याची संधी असते. त्यांच्या हातात पुस्तकं असायला हवी होती, दोरी नव्हे. त्यांना शिक्षा नव्हे, तर समजावणं गरजेचं होतं. ही घटना समजून घेताना समाज केवळ त्या वडिलांना दोष देऊन थांबू शकत नाही; पण त्यांना माफही करू शकत नाही. ही एक अशी शोकांतिका आहे, जिथे राग, व्यसन, सामाजिक दबाव आणि अज्ञान एकत्र येऊन माणुसकीवरच घाला घालतात. अनेक घटनांच्या मागे हीच कारणं असतात, ज्याकडे दुर्लक्ष होते. नाहीतर एक बाप आपल्या मुलीवर हात कसा उचलू शकतो? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभा राहतो. पण जेव्हा दारू माणसाच्या डोक्यावर चढते, तेव्हा तो स्वत:लाच ओळखू शकत नाही. विवेक हरवतो, आणि क्षणिक राग कायमचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. किरकोळ कारणातून होणारे वाद आणि खून, कर्जबाजारीपणा आणि इतर दबावामुळे कुटुंबांची होणारी सामूहिक आत्महत्या किंवा मुलांना मारून आई-बाबांनी जीव देणे अशा घटना समाजात घडत राहतात. कर्ता शेतकरी स्वत:ची उत्तरदायित्वं विसरून केवळ कर्जाच्या चिंतेत आयुष्य संपवून आपल्या पत्नी आणि मुलांना त्या कर्जाच्या संकटात टाकून जीव गमावतो, अशा हजारो घटना घडतात आणि मातीत मिसळून जातात. या सर्व घटनांमागे एक सामान्य धागा दिसतो तो मानसिक ताण, निराशा, एकटेपणा आणि मदतीचा अभाव. या घटना रोखायला समुपदेशन गरजेचे आहे. तसेच समाजाचे सहानुभूतीपूर्ण वृत्ती वाढणे आणि समाजातील सर्व वर्गांना सोबत घेऊन जाण्याची भावना अत्यंत आवश्यक आहे. तसा आधार जर माणसांना मिळाला तर त्यांचे मानसिक खच्चीकरण थांबते आणि अशा अघोरी कृत्यापासून ते कायमचे परावर्त होऊन एका सामान्य माणसासारखे जीवन जगू शकतात. महाराष्ट्रात असो किंवा देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही अशी सामाजिक व्यवस्था निर्माण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यासाठी एखाद्या विशेष विभागाने काम करण्याची गरज आहे. गावोगाव अशा निराशाग्रस्त व्यक्तींच्या समुपदेशनासाठी आणि त्यांची मानसिक जडणघडण करण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. ही घटना केवळ दु:ख व्यक्त करून विसरण्यासाठी नाही. ती समाजाला जागं करण्यासाठी आहे. प्रत्येक आई-वडिलांनी स्वत:ला एक प्रश्न विचारावा ‘आपण आपल्या मुलांना घडवतो आहोत की घाबरवतो आहोत?‘ मुलं चुकतात, पण ती आपलीच असतात. त्यांना ओरडणं सोपं आहे, पण समजून घेणं कठीण आहे. खरी पालकत्वाची कसोटी तिथेच लागते. बनपूरीसारख्या गावातील एका खोपटात राहणाऱ्या निराश माणसापर्यंत हा विचार पोहोचू शकत नाही, पण अशा निराशायुक्त समाजातील व्यक्तींच्या समुपदेशनासाठी शासनाने ही व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. त्या रात्री त्या दोन मुली दोरीवर टांगलेल्या नव्हत्या. टांगलेलं होतं बालपण, विश्वास आणि माणुसकी. एका चिमुकलीचा जीव गेला, पण तिच्यासोबत आपल्या समाजातील संवेदनाही कुठेतरी मरत चालल्या आहेत. आज प्रत्येक बापाने आपल्या मुलीला घट्ट मिठी मारावी... आणि स्वत:ला विचारावं ‘रागाच्या एका क्षणासाठी मी तिचं आयुष्य धोक्यात तर घालणार नाही ना?‘ जर या प्रश्नाचं उत्तर ‘नाही‘ असं ठामपणे देता आलं, तरच त्या निरागस जीवाच्या मृत्यूला खरी श्रद्धांजली ठरेल. समाजानेही बदलायला हवं. टीका करणं थांबवून साथ देणं शिकायला हवं. एखादं कुटुंब अडचणीत असेल, तर त्याला उभं करण्याची जबाबदारी आपली आहे. अशा घटनांमुळे केवळ एक कुटुंब तुटत नाही, तर संपूर्ण समाजाची माणुसकी तुटते. त्यामुळे अशा शोकांतिकांना रोखण्यासाठी व्यक्तिगत, सामाजिक आणि सरकारी पातळीवर सतत प्रयत्न होणे गरजेचे आहे. फक्त एका घटनेनंतर हादरून जाणे पुरेसे नाही; दीर्घकालीन उपाययोजना आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे हे आजच्या काळातील महत्त्वाचे आव्हान आहे.