चिमुकल्यांचा मारेकरी जावेदला बरेलीत अटक
उत्तरप्रदेशच्या बदायूंत दोन मुलांची हत्या
वृत्तसंस्था /बदायूं
उत्तरप्रदेशच्या बदायूंमध्ये दोन मुलांची निर्घृण हत्या करणाऱ्या एका आरोपीचा मंगळवारी चकमकीत मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या फरार आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी साजिदच्या मृत्यूनंतर जावेद फरार झाला होता. पोलिसांनी त्याला बरेली येथे जेरबंद केले आहे. अटक होण्यापूर्वी जावेदने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. बदायूं येथे हत्या झाल्यावर आपण दिल्लीत पळालो होतो. तसेच यासंबंधी अनेक लोकांना माहिती दिली होती. आत्मसमर्पण करण्याच्या उद्देशाने बरेली येथे आल्याचा दावा जावेदने व्हिडिओत केला होता. मुलांच्या हत्येत माझा हात नव्हता. साजिदनेच दोन्ही मुलांची हत्या केली होती. साजिदने या मुलांची हत्या का केली हे मला माहित नसल्याचा दावाही जावेदने केला आहे. तर जावेद स्वत:ला वाचविण्यासाठी खोटं बोलत असल्याचा आरोप हत्या झालेल्या मुलांच्या आईने केला आहे. जावेदनेच साजिदला बाइकवरून आमच्या घरी आणले होते. हत्येनंतर साजिदने माझ्या घरातून कुणाला तरी फोन केला होता. साजिदने अखेर हा फोन कुणाला केला होता हे पोलिसांनी शोधून काढावे. आमच्या घरी तो का आला होता याचे उत्तर जावेदने द्यावे असे संगीता यांनी म्हटले आहे. साजिद हा जावेदचा सख्खा भाऊ होता. साजिद हा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला होता. तर जावेदच्या विरोधात पोलिसांकडून 25 हजार रुपयांचे इनाम घोषित करण्यात आले होते.