Shirala News : बिऊर येथील बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा दुर्दैवी मृत्यू
नागरिकांचे सहकार्य प्रशंसनीय; बिबट्याचा शोध सुरू
शिराळा : बिऊर येथील बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू ही दुर्देवी घटना आहे. वनविभागामार्फत पुणे येथील रेस्कु टीम आणि डॉग स्कॉड दाखल झाले असून बिबट्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे अशी माहिती कोल्हापूर विभाग मुख्य बनरक्षक (प्रादेशिक) जी गुरुप्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपवनसंरक्षक सागर गवते, वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, बनपाल अनिल बाजे यांची उपस्थिती होती. जी गुरुप्रसाद यांनी सांगीतले की, पुणे रेस्कु टीम येथील स्थानिक कर्मचायांना बिबट्या बाबत प्रशिक्षण देणार आहेत. याचबरोबर अशा घटना घडू नये याची दक्षता पुढीलकाळात घेतली जाईल. डॉग स्कॉड प्रमुख शोमीत भिडे, शुभम सिंग हे बिबट्याचा शोध घेत आहेत. सध्या सहा ड्रोन कॅमेरे आहेत आता आणखी ३०-३५ ड्रोन कॅमेरे खरेदी करणार आहे. प्रत्येक गार्ड कडे चार ड्रोन कॅमेरे देण्याची व्यवस्था करण्यात येईल. याचबरोबर रेस्कु टीम साठी आवश्यक अत्याधुनिक साहित्य ही लवकरच पुरविण्यात येईल.
बिऊर येथील बिबट्याचा शोध घेत आहे. त्याठिकाणी नागरिकांचे चांगले सहकार्य मिळत आहे. मृत राजबीर हणमंत पाटील यांच्या वारसांना आज पंचवीस लाख रुपयांची नुकसान भरपाई पैकी १० लाख रुपयांचा धनादेश व पंधरा लाख रुपयांची ठेव पावती देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली.