भारतीय हवाई रुग्णवाहिका न मिळाल्याने मुलाचा मृत्यू
मालदीव सरकारचा हट्ट ठरला जीवघेणा : अध्यक्ष मुइज्जू यांनी नाकारली परवानगी
वृत्तसंस्था/ माले
मालदीव आणि भारत यांच्यातील वादामुळे मालदीवमधील 14 वर्षीय गंभीर आजारी मुलाचा मृत्यू झाला आहे. त्याचा जीव वाचविण्यासाठी तत्काळ एअरलिफ्ट करून रुग्णालयात नेणे गरजेचे ठरले होते, परंतु अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताच्या डॉर्नियर विमानाच्या वापराला अनुमती नाकारली. यामुळे या मुलाला वाचविता आले नाही.
हा मुलगा ब्रेन ट्यूमर आणि स्ट्रोकने ग्रस्त होता. त्याच्या कुटुंबाने अलिफ विलिंगलीच्या विलमिंगटन बेटावरून मुलाला मालदीवची राजधानी माले येथे एअरलिफ्ट करण्यासाठी हवाई रुग्णवाहिका मागविली होती. याकरता त्यांनी बुधवारी रात्रीपासूनच एअरलिफ्टची विनंती करण्यास सुरुवात केली होती. परंतु गुरुवारी सकाळपर्यंत कुटुंबाच्या मागणीला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यात आला नाही. गुरुवारी सकाळी देशातील विमानो•ाण विभागाकडून प्रतिसाद मिळेपर्यंत 16 तास उलटून गेले होते. या विलंबामुळे या मुलाचा मृत्यू झाला आहे.
आम्ही आयलँड एव्हिएशनला कॉल करत त्वरित मदत मागितली होती. परंतु आम्हाला कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. अशाप्रकरणांमध्ये हवाई रुग्णवाहिका मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे मुलाच्या वडिलांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी 4 जानेवारी रोजी लक्षद्वीप दौऱ्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात लक्षद्वीप नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टीकोनातून मालदीवच्या तोडीस तोड असल्याचे दिसून आले होते. यामुळे लाखो रुपये खर्च करून मालदीव येथे जाण्यापेक्षा लक्षद्वीपला जाणे योग्य असे मत सोशल मीडियावर व्यक्त झाले होते. यामुळे भडकलेल्या मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तेव्हापासून दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणावाचे वातावरण आहे. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारतीय सैनिकांना देशातून बाहेर पडण्यास सांगितले आहे.