जाडरबोबलाद येथे डबक्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू
जत :
जाडरबोबलाद (ता. जत) येथे खेळत असताना घराच्या बांधकामासाठी खणण्यात आलेल्या पाण्याच्या डबक्यात बुडून चौदा महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. सुदैवाने अन्य एकाचा जीव वाचला आहे. श्रवण महेश चनगोंड (वय १ वर्ष ४ महिने) असे मृत चिमुकल्याचे नाव असून करण महेश चनगोंड (वय २ वर्षे ५ महिने, दोघे ही रा. जाडरबोबलाद, ता. जत) याची प्रकृती गंभीर आहे. त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे.
महेश चनगोंड यांच्या शेतात घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाच्या कामासाठी घराच्या शेजारीच पाच ते सहा फुटाचे डबक खणण्यात आलेले आहे. त्यामध्ये पाणी साठविण्यात आलेले आहे. आज सकाळी ११ वाजता चौदा महिन्याचा श्रवण व अडीच वर्षाचा करण अंगणात खेळत होते. आई घरच्या कामात व्यस्त होती. वडील महेश हे सांगली येथे फायनान्स कंपनी मध्ये काम करतात. तर आजोबा नेहमीप्रमाणे गावात गेले होते. आजी शेतात कामासाठी गेल्या होत्या. दोन्ही मुलं घराशेजारी खेळत खेळत पाण्याने भरलेल्या डबक्यात पडले. या घटनेनंतर दोघांना ही तात्काळ पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांना जत शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, श्रवण यांच्या पोटात भरपूर पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले तर करण याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून मिरज येथे उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी पुढे पाठवून देण्यात आले.
या दुर्दैवी घटनेने जाडरबोबलाद गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.