भिक मागणाऱ्या मुलाला बालसंकुलात दाखल
बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांची शहरात पाहणी
प्रतिनिधी/ बेळगाव
बालकामगारांच्या सुरक्षिततेसाठी अधिकाऱ्यांनी पुढे यावे या जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शनिवारी महिला व बालकल्याण खाते आणि पोलीस हेल्पलाईनच्या पोलिसांनी भिक मागणाऱ्या दोन मुलांना बालसंकुलात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र यापैकी एका बालकाच्या पालकांनी तो आपला मुलगा असल्याचे सांगून त्याला परत नेले. यामुळे मुलांनी केलेल्या आक्रस्ताळामुळे लोकांमध्ये संभ्रम होऊन बघ्यांची गर्दी झाली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अलीकडच्या काळात शहरात विविध राज्यातून आलेल्या स्थलांतरितांची संख्या वाढत आहे. तसेच बसस्थानक, बसथांबे व शहरात ठिकठिकाणी बाल भिकारी दिसत आहेत. तसेच बालकामगारही वेगवेगळ्या वस्तू विकताना आढळून येतात.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्हा कामगार योजना संस्था कार्यकारी समितीची बैठक घेऊन बालकामगारांच्या सुरक्षिततेसाठी सक्रिय होण्याचे आवाहन केले होते. याबाबत त्यांनी कोणते उपक्रम राबवावेत? कशाप्रकारे जनजागृती करावी? याचीही माहिती दिली होती. अधिकाऱ्यांनी बालकामगारांना, तसेच भिक मागणाऱ्या बालकांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता.
याचीच नोंद घेऊन महिला बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी शहरात पाहणी केली व भीक मागणाऱ्या दोन मुलांना आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या मुलांनी जोरात आक्रस्ताळ सुरू केला. त्यामुळे बघ्यांची गर्दी झाली. पोलीस आपल्याला नेत आहेत, या भीतीने गांगरलेल्या मुलांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तेथे एक जोडपे हजर झाले. त्यांनी एक मुलगा आपला असल्याचे सांगितले व अधिकाऱ्यांना न जुमानता त्याला परत नेले. दुसऱ्या एका मुलाला सध्या बालसंकुलात दाखल करण्यात आले आहे. त्याला सोमवारी बालसुरक्षा समितीसमोर हजर केले जाणार आहे.