चिकोत्रा धरणावर आजपासून उपसाबंदी लागू
कोल्हापूर
चिकोत्रा धरण पूर्ण क्षमतेने भरले तरी उपसाबंदी ठरलेली आहे. ज्यावेळी धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्या काळामध्ये प्रत्येक आवर्तनावेळी उपसा बंदी ठरलेली असायची. पण धरण पूर्ण क्षमतेने भरून देखील उपसा बंदी पहिल्या आवर्तनापासूनच पाटबंधारे विभागाने लागू केली आहे.
चिकोत्रा धरण हे दीड टीएमसी क्षमतेचे आहे. 1520 एमसीएफटी इतकी या धरणाची क्षमता आहे. सन 2000 सालापासून या धरणामध्ये पाणी साठवले जाते. या धरणाचे जलस्त्राsत कमकुवत असल्यामुळे धरण 100 टक्के भरेल का ? याची खात्री नसते. सुरुवातीच्या 20 वर्षामध्ये केवळ वर्षांमध्ये केवळ पाच वेळा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र पाणी जूनपर्यंत पुरविण्याच्या दृष्टीने जिह्यात सर्वात अगोदर व पुढे मेपर्यंत प्रत्येक आवर्तनावेळी उपसा बंदी लागू असणारी चिकोत्रा एकमेव नदी आहे.
पावसाळ्यानंतर पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्याचे काटेकोरपणे नियोजन केले जाते. धरणामध्ये जूनपर्यंत पाणी शिल्लक कसे राहील ? याची काळजी घेतली जाते. गतवर्षी धरणामध्ये 33 टक्के पाणी शिल्लक होते. त्यामुळे जिह्यात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवली पण चिकोत्रा ख्रोयात ही पाणीटंचाई तशी जाणवली नाही. यावर्षी पहिले आवर्तन 5 डिसेंबर 2024 पासून सुरू होत असून प्रत्येक आवर्तनावेळी दहा दिवसांची उपसा बंदी पाटबंधारे विभागाकडून लागू केली आहे. सदरची उपसाबंदी ही पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांनी ही उपसाबंदी जाहीर केलेली आहे.
चिकोत्रा नदीवर धरणाच्या झुलपेवाडी पासून कागल तालुक्यातील बेळुंकीपर्यंतच्या चिकोत्रा नदीवर एकूण 29 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत.
अशी आहे उपसाबंदी...
मे 2025 अखेर एकूण आठ वेळा धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचे पाटबंधारे विभागाने नियोजन केले आहे. 5 डिसेंबर ते 14 डिसेंबर पहिल्या आवर्तनावेळी उपसाबंदी राहील. त्यानंतर 32 डिसेंबर ते 9 जानेवारी, 26 जानेवारी ते 4 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी ते 2 मार्च, 15 मार्च ते 24 मार्च, 6 एप्रिल ते 15 एप्रिल, 28 एप्रिल ते 7 मे आणि 20 मे ते 29 मे अशी दहा दिवसांची प्रत्येक आवर्तनावेळी उपसा बंदी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चार ते पाच दिवसच चिकोत्रा नदीतून पाणी उपसा करता येणार आहे.