माशेल येथे आजपासून ‘चिखल काला’ महोत्सव
मुख्यमंत्री प्रमोद सावंत करणार उद्घाटन : तीन दिवस रंगणार पारंपरिक महोत्सव : स्थानिक तसेच पर्यटक हजेरी लावणार
प्रतिनिधी / पणजी
पर्यटन खात्यातर्फे चिखलकाला आयोजित करण्यात आला असून त्याचे उद्घाटन आज मंगळवार दि. 16 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वा. करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्याचे उद्घाटन करणार असून हा चिखलकाला महोत्सव सलग तीन दिवस म्हणजे 16 ते 18 जुलै असा साजरा होणार आहे. त्याला गोवा चिखल महोत्सव (मड फेस्टिव्हल) असे नाव देण्यात आले आहे.
माशेल येथील देवकीकृष्ण देवस्थानात हा महोत्सव होणार असून बाळकृष्णाची बाललिला म्हणून तो साजरा केला जातो. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर, पर्यटन खाते संचालक सुनिल आंचिपाका, पर्यटन सचिव संजीव अहुजा, मुख्य सचिव पुनितकुमार गोयल हे उद्घाटनासाठी हजेरी लावणार आहेत.
या चिखलकाल्यास राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून तो आता भव्य - दिव्य अशा स्वऊपात साजरा केला जाणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून तो पाहण्यासाठी देशी, विदेशी पर्यटक यावेत म्हणून पर्यटन खात्याने त्याची माहिती विविध मार्गाने प्रकाशित केली आहे. तीनही दिवस सायंकाळी हा ‘चिखल काला’ रंगणार असून स्थानिक तसेच गोव्यातील लोक तो पाहण्यासाठी गर्दी करणार आहेत. पर्यटन वाढीसाठी त्याचा उपयोग करण्याचा पर्यटन खात्याचा इरादा आहे.