For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्र्यांचा डिचोलीत झंझावती ‘जल दौरा’

11:36 AM Jan 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्र्यांचा डिचोलीत झंझावती ‘जल दौरा’
Advertisement

तिळारी कालवा, साळ प्रकल्प, आमठाणे धराणी केली पाहणी : पुढील 25 वर्षांच्या दृष्टीकोनातून जलप्रकल्पांची निर्मिती ,तीनही प्रकल्पांवर सरकारकडून सुमारे 500 कोटी खर्च 

Advertisement

डिचोली : डिचोली मतदारसंघातील साळ, आमठाणे व तिळारी कालव्याच्या सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण जल प्रकल्पांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल शुक्र. दि. 24 जाने. रोजी सकाळच्या सत्रात झंजावती दौरा करत पाहणी केली. सरकारतर्फे सुरू असलेल्या या तीनही प्रकल्पांच्या कामांबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. हे प्रकल्प डिचोली तसेच बार्देश, पेडणे व परिसरातील भागांसाठी येणाऱ्या काळात महत्त्वपूर्ण ठरणार असून या त्यांवर सरकारतर्फे पाचशे कोटी ऊपये खर्च करण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी, सचिव श्री. गील, सहाय्यक अभियंता आनंद पंचवाडकर, कनिष्ठ अभियंता विनोद भंडारी, नरेश पोकळे व इतरांची उपस्थिती होती.

Advertisement

तिळारी कालव्यांचे गोव्यातील काम हे उत्कृष्ट आहे, मात्र महाराष्ट्रातील कालव्यांचे काम हे खराब असल्याने वारंवार कालवा फुटण्याचे प्रकार घडतात. गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रातील कालवे काँक्रिटीकरणाने बनविण्यात यावे यासाठी गोवा सरकारतर्फे 128 कोटी ऊपये मंजूर करण्यात आले आहे. हा निधी गोवा सरकार खर्च करणार असून काम महाराष्ट्र सरकारने करावे. अशी व्यवस्था असून त्यासाठी गोवा सरकारकडून महाराष्ट्र सरकारकडे बोलणी सुरू आहे. हे काम लवकरच हाती घेतल्यानंतर कालव्यांची परिस्थिती सुधारणार व वारंवार कालवे फुटण्याचे प्रकार बंद होणार, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोडामार्ग येथे तिळारी कालव्याची पाहणी केल्यानंतर सांगितले.

साळ बंधारा प्रकल्प ठरणार वरदान

साळ गावात शापोरा नदीवर उभारण्यात येणारा बराज बंधारा हा प्रकल्प डिचोली, पेडणे तसेच बार्देश तालुक्यासाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पातून पाणी पंपिंग करून आमठाणे धरणात सोडण्यात येणार आहे. पेडणे तालुका, मोपा विमानतळ व इतर भागांसाठी या पाण्याचा वापर होईल. चांदेल प्रकल्पालाही या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. दिवसाला 240 एमएलडी पाणी या प्रकल्पातून वापरले जाणार असून या प्रकल्पाला नदीप्रमाणेच तिळारी धरणातील पाणीही मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे भविष्यात जर तिळारी कालव्यामुळे कोणतीही समस्या निर्माण झाली, तर या बंधारा उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पावर सरकार 350 कोटी ऊपये खर्च करीत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

साळ गाव पावसाळ्यात राहणार सुरक्षित

या बराज बंधाऱ्यामुळे साळ गावाचा पावसाळ्यातील पुराचा धोका कमी होणार आहे. पूर्वीच्या बंधाऱ्याला जवळजवळ लहान खांब असल्याने पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारी झाडे अडकून पूर येत होता. आता नवीन  बंधाऱ्याला कमी व मोठे खांब असल्याने कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. त्यामुळे परिसरात पाणी भरण्याची शक्यता कमी आहे. त्याचप्रमाणे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांच्या आग्रहानुसार साळ गावाच्या सुरक्षिततेसाठी गावाला लागून एक संरक्षण भिंत उभारण्यात येणार आहे, त्यामुळे साळ गाव हा पावसाळ्यात यापुढे सुरक्षित राहणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आमठाणे धरणातूनही पुरवठा वाढणार

आमठाणे धरणातून कालव्यामार्गे अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी पाणी पुरवले जाते. ही प्रक्रिया चालू असताना या धरणातून धुमासे येथे येणाऱ्या काळात होणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी पाणी पंपिंग करून पुरविले जाणार आहे. या धरणाची पातळी सर्व मोसमामध्ये समतोल राखण्यासाठी साळ येथील बंधाऱ्यातून पाणी पंपिंग करून धरणाच्या जलाशयात सोडले जाते. त्यामुळे या धरणाची पातळी घटत नाही, येणाऱ्या काळातही हीच व्यवस्था चालूच राहणार आहे. त्यामुळे तिळारी कालवा नादुऊस्त झाल्यास अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पावर पाण्याच्या कमतरतेमुळे येणारा ताण कमी होणार आणि आमठाणे धरणातून मुबलक पाणी अस्नोडा येथे पुरविले जाणार आहे.

आमठाणे धरण बनतेय पर्यटकांचे आकर्षण

आमठाणे धरण हे सध्या विकासकामांमुळे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. या धरणावर दर शनिवारी, रविवारी मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती असते. त्यासाठी या धरणाच्या परिसरात स्थानिकांसाठी हातगाडे घालण्याची परवानगीची मागणी यावेळी स्थानिक आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, व जलस्त्राsतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याकडे केली. या मागणीला सल्ला सूचविताना मुख्यमंत्र्यांनी सदर गाडे हे हातगाडेच असावे व ते एकाच आकाराचे व डिझाईनचे असावे असे सांगितले. या गाड्यांमुळे दुकाने व हॉटेल्स तयार होऊन कचरा व अस्वच्छता माजू नये याची काळजी घ्यावी लागणार, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सर्व कामे योग्य मार्गाने सुरू : आमदार डॉ. शेट्यो 

डिचोली मतदारसंघात साळ येथे साकारण्यात येणारा बराज बंधारा, आमठाणे धरणाचे सौंदर्यीकरण व इतर आवश्यक विकास व लाटंबर्से येथील तिळारी कालवा या तीनही प्रकल्पांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाहणी केली. या पाहणीत तीनही कामांबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त करताना, काम योग्य प्रकारे व आवश्यक त्या वेगाने सुरू आहे. त्यामुळे ही सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण होणार याची खात्री व्यक्त केली. यावरूनच डिचोली मतदारसंघात सरकारतर्फे सुरू असलेल्या प्रकल्पांना योग्य गती मिळालेली आहे व सर्व कामे योग्य मार्गाने सुरू असल्याचे समजते. ही सर्व कामे तसेच इतरही विकासकामे नियोजित वेळीच पूर्ण करून लोकार्पण करण्याचा आपला मनोदय आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.