सावंतवाडीत उद्या 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' कार्यशाळा
सावंतवाडी । प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' या उपक्रमाची माहिती देण्यासाठी उद्या, १२ सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा काझी शहाबुद्दीन सभागृह, एसटी स्टँडसमोर दुपारी २.०० वाजता सुरू होईल.ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढवून त्यांना अधिक प्रभावी करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून हे पुरस्कार अभियान तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य अशा चार स्तरांवर राबवले जाणार आहे. यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना सुमारे २४३ कोटी रुपयांच्या पुरस्काराची तरतूद करण्यात आली आहे . या कार्यशाळेमध्ये सावंतवाडी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामरोजगार साहाय्यक यांना अभियानाची माहिती दिली जाईल. अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ असा असून, यामध्ये सुशासन, जलसमृद्ध व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, सामाजिक न्याय आणि लोकसहभाग यांसारख्या बाबींवर गुणांकन केले जाईल. पंचायत समिती सावंतवाडीचे गट विकास अधिकारी (उच्चस्तर) वासुदेव नाईक यांनी या कार्यशाळेत सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.