काश्मीर मॅरेथॉनमध्ये मुख्यमंत्र्यांची धाव
दोन तासात 21 किमीचा पल्ला पार
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर चार दिवसांनी ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी काश्मीर हाफ मॅरेथॉन शर्यतीत धाव घेतला. श्रीनगरच्या पोलो स्टेडियमवरून मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर त्यांनी 21 किलोमीटरचा पल्ला 2 तासात पूर्ण केला. आज मी स्वत:वर खुश आहे. तणाव कमी करण्यासाठी औषधांची गरज नाही. चालणे आणि धावणेही उत्साह निर्माण करण्यासाठी आणि तणाव दूर करण्यासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी उपस्थितांना केले. तसेच ड्रग्जमुक्त जम्मू-काश्मीरसाठी आपण अशा चालणे-पळणे यासारख्या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायला सुऊवात केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. आज मी 21 किलोमीटरची शर्यत सरासरी 5 मिनिटे 54 सेकंद प्रतिकिलोमीटर वेगाने पूर्ण केली. आयुष्यात 13 किलोमीटरपेक्षा जास्त धावलो नव्हतो. मात्र, माझ्यासारख्या इतर हौशी धावपटूंच्या उत्साहाने प्रेरित होऊन आज मी चालत राहिलो. कोणतेही नियोजन नव्हते. वाटेत फक्त एक केळे आणि दोन खजूर खाल्ल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.