For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तर कर्नाटकावर आज मुख्यमंत्र्यांचे उत्तर

11:09 AM Dec 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
उत्तर कर्नाटकावर आज मुख्यमंत्र्यांचे उत्तर
Advertisement

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत आमदारांकडून मतप्रदर्शन

Advertisement

बेळगाव : उत्तर कर्नाटकाच्या विकासावरील चर्चेला बुधवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे उत्तर देण्याची शक्यता आहे. सभाध्यक्ष यु. टी. खादर फरीद यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत यावर विधानसभेत चर्चा घडवून आणली. उत्तर कर्नाटकातील आमदारांना बोलण्याची संधी दिली. प्रश्नोत्तराच्या तासानंतर आमदार बसवराज रायरेड्डी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकार हे जनहिताचे काम करत आहे. अनेक योजना केंद्राकडून अडल्या आहेत. नवी रेल्वेलाईन किंवा राष्ट्रीय महामार्ग केंद्राकडून मंजूर झाले नसले तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कर्नाटकासाठीचे योगदान महत्त्वाचे आहे, असे सांगत त्यांनी अभिनंदन केले.

हैद्राबाद व कित्तूर कर्नाटकात 14 जिल्हे येतात. या जिल्ह्यांचा सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, कृषीविषयक विकास होणे गरजेचे आहे. सिद्धरामय्या सरकारने कौशल्याधारित विद्यापीठाचा प्रस्ताव पाठवला आहे. अर्थसंकल्पात त्याची घोषणा व्हायची शक्यता आहे. कृष्णा, कावेरी या प्रमुख नद्या आहेत. 19 हजार कोटींची योजना 2 लाख कोटींवर पोहोचली आहे. केंद्राने कर्नाटकाचे प्रकल्प हातावेगळे करण्यासाठी विरोधी पक्षांनी हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले. बदामीचे आमदार बी. बी. चिम्मनकट्टी यांनी उत्तर कर्नाटकात पर्यटन वाढीला उत्तेजन देण्याची मागणी केली. तर देवदुर्गचे आमदार करेम्मा नायक यांनी कॅन्सर इस्पितळ, महिला शौचालय आदी प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले.

Advertisement

त्वरित दारुबंदी करा : शरणू सलगर

व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सरकारने त्वरित दारुबंदी करावी, अशी मागणी बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर यांनी केली. उत्तर कर्नाटकावरील चर्चेदरम्यान तरुणाई दारू, गांजाच्या आहारी जात आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. सरकार भरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहे. महाराष्ट्रातील तीन जिल्हे आपल्या मतदारसंघाला लागूनच आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीनंतर 31 हजार 628 कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने तेथील शेतकरी आनंदी आहेत. कर्नाटक सरकारकडून आम्हाला पुरेशी भरपाई मिळाली नाही. ग्रामीण भागात सलमान खान, शाहरुख खानलाच खरे हिरो समजतात. याउलट छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा आदर्श घ्यायला हवा. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर्श घ्यायला हवा. आपल्या भागात कोणीही हेल्मेट परिधान करत नाही. म्हणून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. तुम्ही दारुबंदी करा, तुमचे फोटो देव्हाऱ्यात ठेवून पूजा करू, असेही शरणू सलगर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.